
सामना प्रतिनिधी। कोपरगाव
धोंडा जेवणासाठी राहाता येथे जाणाऱ्या दाम्पत्य दुचाकीला रसायनाने भरलेल्या टँकरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पती पत्नी जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी घडली आहे. तीनचारी कोकमठाण शिवारातील हिंदूस्थान ट्रेडर्स समोर हा अपघात झाला. बाळासाहेब ज्ञानदेव घोंगते आणि शोभा बाळासाहेब घोंगते अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान टँकर चालकाला अटक करण्यात आली आहे.
घोंगते कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे राहत होते. नातवाला पाहण्यासाठी व शेवटचा दिवस असल्याने धोंडा जेवण्यासाठी ते पत्नीबरोबर दुचाकीवरुन राहाता येथे जात होते. दुपारी १२.३० ते १२. ४५ वाजता सुमारास त्यांच्या दुचाकी तीनचारी कोकमठाण शिवारातील हिंदूस्थान ट्रेडर्स समोर आली असता मागून येणाऱ्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे बाळासाहेब आणि शोभा हे रस्त्यावर पडले व रसायनाने भरलेला टँकर दोघांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात राजेंद्र ज्ञानदेव घोंगते ४८ किराणा दुकान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवी कलम ३०४ (अ) ,२७९,नुसार अपघाताची नोंद करण्यात आली असून, टेम्पोचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
चालक जलाराम उदाराम विष्णोई (३२) रा. गुंदाऊ जि. जालोर राजस्थान याला अटक करण्यात आली आहे.

























































