कोपरगावातील जनावरांचा बाजार चार महिन्यानंतर होणार पुन्हा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लम्पी स्कीन आजारामुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेला कोपरगाव येथील जनावरांचे बाजार येत्या सोमवार म्हणजेच 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. लम्पी स्कीन आजाराचे प्रमाण आटोक्यात आल्याने आणि बहुतांश जनावरांना लसीकरण झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर बाजाराला व वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती कोपरगाव बाजार समितीचे प्रशासक नामदेव ढोंबळ यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

राज्यात गोवंशाला लागण होत असलेल्या लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने जनावरांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती. तसेच जनावरांचे आठवडी आणि जत्रा- यात्रांमधील बाजार बंद करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजना व प्रतिबंधात्म़क लसीकरणामुळे लम्पी आजार आटोक्यात आला आहे.बाजार बंद असल्यामुळे जनावरांच्या घरगुती होणा-या खरेदी-विक्री व्यवहारात मोठया प्रमाणात शेतक-यांची फसवणुक होत होती. जनावरांच्या विक्रीची योग्य़ किंमत शेतक-यांना मिळत नव्ह़ती. त्यामुळे बाजार समितीकडे शेतकरी व व्यापारी यांनी जनावरे बाजार सुरु करणे बाबत वारंवार मागणी केली होती. जिल्हाधिकारी यांनी काही अटी ठेवून बाजार भरविण्यास परवानगी दिल्यामुळे शेतकरी, पशुपालक, व्यापारी, दलाल व व्यवसायिक यांनी आनंद व्यक्त़ केला आहे.

जनावरे बाजारात विक्रीसाठी आणतांना जनावरांच्या कानास टॅग नंबर असणे व इनाफ पोर्टलवर त्याची नोंदणी आवश्य़क आहे. जनावरांचा आरोग्य़ दाखला सोबत बाळगणे गरजेचे आहे. लसीकरण झाल्याची खात्री झाल्याशिवाय जनावरे बाजारात प्रवेश दिला जाणार नाही. तरी शेतकरी व खरेदीदार व्यापारी यांनी वरील अटींचे पालन करुन जनावरे बाजारात जनावरे विक्रीस आणावे असे आवाहन बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर यांनी केले आहे.