
येथील तहसील कार्यालयालगत असलेल्या दुय्यम कारागृहातील 91 कैद्यांपैकी 50 कैद्यांना नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले आहे. क्षमतेपेक्षा जादा झालेल्या कैद्यांची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे तुरुंग अधिकारी चंद्रशेखर कुलथे यांनी सांगितले. यातील बहुतांश कैदी गंभीर गुह्यातील असल्याने मोठा बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, 16 कैद्यांची क्षमता असलेल्या या दुय्यम कारागृहात अजूनही 41 कैदी आहेत. इतक्या मोठय़ा प्रमाणावर कैद्यांना वर्ग करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
कोपरगाव येथील दुय्यम कारागृहात एकूण चार बराकी असून, त्यात कोपरगाव, शिर्डी, राहाता व लोणी या एकूण चार पोलीस ठाण्यांचे न्यायालयीन चौकशीतील कैदी ठेवण्यात येतात. 16 कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात 91 कैदी होते. त्यांची सुरक्षा, औषधोपचारांचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पाण्याच्या कमतरतेमुळेही तहसीलदार व निवासी नायब तहसीलदार हे कैदी अन्यत्र पाठवण्याच्या प्रयत्नात होते. तहसीलदार विजय बोरुडे यांनी हजर झाल्यावर कारागृहाला भेट दिली होती. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, शिर्डी उपविभागाचे पोलीस अधिकारी संजय सातव यांनीही या गहन प्रश्नावर तुरुंग प्रशासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार येरवडा येथील पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी हे 50 कैदी पाठविण्याची परवानगी दिली. कैद्यांना वर्ग करताना पोलीस पथकास सुरक्षाविषयक सूचनांचे पालन करून कोरोनाची तपासणी करून निगेटिव्ह प्रमाणपत्रासह वर्ग करण्यात यावे, अशी अट घालण्यात आली होती. या 50 कैद्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येऊन दोन मोठय़ा पोलीस गाडय़ांमधून 25 शस्त्रधारी पोलीस, एक पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक व तीन उपनिरीक्षक अशा पोलीस बंदोबस्तात पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकला वर्ग करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी खून, बलात्कार, दरोडा, बनावट नोटा प्रकरण, हाणामाऱया पाकीटमार, अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविणे आदी गुन्हय़ातील आहेत.
राहात्यातील तुरुंग अनेक वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
राहाता तहसील कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून कैद्यांसाठी तुरुंग तयार आहे. मात्र, तेथे सध्या रद्दी व भंगार साहित्य पडलेले आहे. तेथील कारागृह का सुरू केले जात नाही याबाबत अनेकांनी सातत्याने आवाज उठविला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ते कारागृह सुरू झाल्यास पोलिसांवरील निम्मा ताण कमी होणार आहे.

























































