
सामना प्रतिनिधी। कोपरगांव
जम्मू कश्मीर परिसरात सध्या मोठया प्रमाणांत बर्फवृष्टी होत असून संपूर्ण देशात थंडीने कहर केला आहे. कोपरगांव तालुक्यात देखील 28 डिसेंबर 2018 रोजी गेल्या सहा वर्षातील अत्यंत निचांकी 4.5 अंश तापमानाची नोंद झाली असून कोपरगांव तालुक्यापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या धामोरीत सर्वत्र हिमकणांचा अनूभव घेतला असून रविवारी 30 डिसेंबर रोजी पहाटेपासूनच सकाळी सात वाजेपर्यंत दवबिंदुचे हिमकणांत रूपांतर झाल्याचे पहावयास मिळाले.
शेतातली हिमकणांची चादर पसरल्याचे पाहून आपण महाबळेश्वरला तर आलो नाही ना ? असा भास धामोरीकरांना होऊ लागला आहे. कोपरगांवकरांच्या इतिहासात प्रथमच बर्फाच्छादित हिमकणाची चादर पहावयास मिळाली. या थंडीचा प्रकोप अजून तीन ते चार दिवस राहणार असल्याची माहिती हवामानखात्यांने दिली आहे. या थंडीमुळे धामोरीकरांची दिनचर्याच गेल्या आठवडाभरापासून बदलून गेली आहे.
राज्यात सर्वात थंड निचांकी तपमानाची नोंद नाशिक जिल्हयातील निफाड येथे 1.2 अंश झाली असून निफाड पासून धामोरी हे अंतर 38 किलोमिटर अंतरावर आहे. निचांकी तपमानाची नोंद कोपरगांवकरांनी अनूभवली. थंड हवामानाचा प्रार्दुभाव सकाळी सूर्य माथ्यावर आला तरी कमी होत असे अनेक ज्येष्ठांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. अंगात दोन स्वेटर घालूनही थंडी जात नाही हा अनूभव अनेकांनी घेतला. यंदा पाऊस झालाच नाही, त्यामुळे दुष्काळी स्थिती मोठी आहे, जनावरांच्या पिण्यांच्या व चा-याचा प्रश्न कोपरगांव तालुक्यात निर्माण झाला. ज्या शेतक-यांकडे काही प्रमाणांत पाणी आहे त्यांनी गहु हरभरा रब्बी पिकांची पेरणी केली त्या पिकांना थंडीचा चांगला लाभ होत आहे.
































































