कोपरी पुलाचे काम ‘फास्ट ट्रॅक’वर, एमएमआरडीएकडून माती परीक्षण सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । ठाणे

ठाणे शहराच्या एण्ट्री-एक्झिटवरील वाहतूककोंडीचे प्रवेशद्वार बनलेल्या कोपरी रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाचे काम अखेर ‘फास्ट ट्रक’वर आले असून एमएमआरडीएने पूर्व द्रुतगती महामार्गावर माती परीक्षणाचे काम वेगाने सुरू केले आहे. त्यामुळे कोपरी पुलाच्या वाहतूककोंडीत तासन्तास अडकणाऱ्या वाहनचालकांनी एकीकडे सुटकेचा निःश्वास सोडला असला तरी भविष्यात या कामापायी होणाऱ्या भीषण कोंडीमुळे त्यांची पाचावर धारण बसली आहे.

पूर्व द्रुतगती महामार्ग आठ पदरी असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक वेगवान आहे. मात्र मुलुंड टोलनाका ओलांडल्यानंतर कोपरी येथील रेल्वे पूल केवळ चार पदरीच असल्यामुळे गेली अनेक वर्षे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर वाहतूककोंडी होते. त्यामुळे ठाणे जिह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार पाठपुरावा करून कोपरी रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा केला. त्यानुसार चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नव्हती. अखेर आठवडय़ाभरापासून एमएमआरडीएकडून आनंदनगर जकात नाका ते ज्ञानसाधना कॉलेजसमोरील पूर्व द्रुतगती महामार्गावर माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले. याकरिता जागोजागी बॅरिकेड्स उभारून कामाला सुरुवात करण्यात आली असून पावसाळ्यानंतर या रस्त्याच्या विरुद्ध बाजूच्या मार्गिकेवर गुरुद्वारासमोर माती परीक्षण कामाला सुरुवात केली जाणार आहे.

बॅरिकेड्सचा वाहतुकीस अडथळा
आधीच कोपरी रेल्वे पूल अरुंद असल्याने सायंकाळी येथून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना अडथळा होत असताना आता पुलाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी लावलेल्या बॅरिकेड्सपायी वाहतूक संथ गतीने पुढे सरकते. येत्या ३६ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होणार असून रुंदीकरणानंतर येथील उड्डाणपूल आठ पदरी होणार आहे.

पर्यायी मार्गिका सज्ज
रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतूककोंडीत भर पडू नये म्हणून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना कोपरी गाव, हरिओम नगर, एमटीएनएल सर्व्हिस रोड येथून पुढे जाण्याबाबत दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत, तर ठाण्याकडे येणाऱ्या वाहनांना एलबीएस रस्त्याकडे जाण्यासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयासमोरील सर्व्हिस रोडकडून पुढे प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून जाण्यासाठी जागोजागी वाहनांना निर्देश देण्यात आले आहेत.