कोरियन मेकअपची भुरळ!

>> शिवानी गोंडाळ

कोरियन लोकांसारखी सुंदर, नितळ, अगदी काचेसारखी चमकणारी त्वचा हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी मेकअप प्रॉडक्टची मदत घेतानाच, अनेक व्हिडीओ पाहून त्याप्रमाणे दिसण्याचा अनेक जणी प्रयत्न करत असतात. कोरियन मेकअप हा नवीन ट्रेंड आहे. त्याकडे अनेक जणी आकर्षिल्या जात असतात.

कोरियन मेकअप हा प्रत्येक त्वचेच्या प्रकारासाठी योग्य आहे, पण ड्राय त्वचेला हायड्रेट दाखविण्यासाठी याचा जास्त उपयोग केला जातो. खरं पाहिलं तर तुम्ही वापरत असलेल्या प्रॉडक्टवर तुमच्या मेकअपचा टिकाऊपणा अवलंबून असतो. मेकअप चांगल्या कंपनीचा वापरावा लागतो. तसेच तुमची त्वचा एकदम ‘क्लियर’ असल्यास हा मेकअप तुमच्या चेहऱ्यावर जास्त छान बसेल. मात्र जर तुमच्या चेहऱयावर डाग, डोळय़ांखाली डार्क सर्कल्स असल्यास या प्रकारचा मेकअप न केलेला चांगला. कारण हा मेकअप एकदम नैसर्गिक प्रकारात मोडत असल्यामुळे अनेक वेळा या मेकअपमध्ये जास्त डार्क सर्कल्स किंवा पिंपल्सचे मोठमोठे डाग लपले जात नाहीत. कोरियन त्वचा किंवा त्यावर केलेला मेकअप हा त्याच्या गोरीपणासाठी व ग्लोसाठी ओळखला जातो.

प्री मेकअपला जास्त महत्त्व
कोरियन मेकअप करण्यासाठी सुरुवात करताना प्रथम चेहऱयावर टोनर लावून घ्यावे. टोनर नसल्यास तुम्ही गुलाबजलचाही वापर करू शकता. त्यानंतर मॉइश्चरायझर लावावे. मॉइश्चरायझरनंतर गरज असल्यास सनस्क्रीनचाही वापर करावा. त्यानंतर तुम्ही प्रायमर लावावे. ओठांवर लीप बाम लावून घ्यावे. चेहऱयावर हे प्री प्रॉडक्ट लावल्यानंतर पाच मिनिटे ते सुकू द्यावेत आणि त्यानंतर मग फाऊंडेशन बेस करायला घ्यावे. फाऊंडेशन बेस करण्यासाठी नॅचरल फाऊंडेशन वापरावे. स्किन टोन फेअर करेल अशा प्रकारचे फाऊंडेशन घ्यावे. कोरियन मेकअप हा ग्लॉसी आणि ग्लोयी असतो. त्यामुळे लाइट वेट फाऊंडेशन लावून झाल्यानंतर त्यावर अगदी हलकीशी पावडर लावावी. पावडर जास्त प्रमाणात लावू नये. तसेच डोळय़ांखाली कन्सिलर लावून त्यावर पुन्हा लाइट पावडर लावावी. डोळय़ांवरील आयशॅडोसाठी शिमर शेडचा वापर करावा. तसेच त्याच्या क्रिस लाइन दिसण्यासाठी त्या डोळय़ांवर प्रॉपर ब्लेंड करून घ्याव्यात. त्यामुळे डोळे नैसर्गिक, पण मोठे वाटतील. तसेच आयलाइनरचा वापर करताना अगदी थीन आयलाइनर लावावे. तसेच मस्काराचा वापर मात्र व्यवस्थित करावा. जेणेकरून आयलॅशेस मोठय़ा भासतील. ब्लशरचा वापर करताना हलक्या गुलाबी रंगाचा वापर करावा. तसेच हायलाइटरचा वापर करा. हायलायटरचा वापर जास्त करावा. ज्यामुळे मेकअप ग्लॉसी दिसेल. त्यानंतर मेकअप फिक्सर लावून घ्या.

– कोरियन मेकअपमध्ये कमीत कमी फाऊंडेशन व कमीत कमी पावडरचा वापर केला जातो. तसेच आयशॅडो व आयलाइनरवर जास्त भर दिला जातो. तसेच या मेकअपमध्ये पापण्यांमध्ये खूप अंतर कमी असते, त्यामुळे डोळय़ांच्या मेकअपला महत्त्व असते. कोरियन मेकअपमध्ये बेस मेकअपला जास्त महत्त्व असते.

– या मेकअपमध्ये सफेद आणि गुलाबी रंगाचा जास्त वापर केला जातो. कोरियन मेकअप ‘नो मेकअप लुक’साठी वापरला जातो.

– कोरियन स्त्रिया स्वतःच स्वास्थ्य, आहार आणि त्वचेची देखभाल हे खूप गंभीरतेने घेत असल्यामुळे ते त्यासाठी मेहनत व पैसा खर्च करण्यासही तयार असतात. कोरियन स्त्रिया या नेहमी डबल टोनिंग, डबल मॉइश्चरायझिंग, डबल हायड्रेशन यावर जास्त भर देतात. त्यामुळे त्यांची स्किन नेहमीच ग्लो करत असते.

– खरं तर स्किन टोन कोणत्याही प्रकारातला असला तरी त्याची देखभाल व्यवस्थितच केली गेली पाहिजे. जेणेकरून तुमची त्वचा नेहमीच चमकत राहील. पण हे सगळे करताना अशा प्रकारच्या गोष्टीचा हव्यास मात्र नसावा. कारण त्यामुळे अनेक वेळा फायद्यापेक्षा तोटा होण्याची जास्त शक्यता असते. मेकअपच्या वेगवेगळय़ा तंत्राचा आनंद घ्या मात्र तो जपून.

(मेकअप आर्टिस्ट)
[email protected]