कोरेगाव भीमातील ऐतिहासिक जागा विकसित करणार, अजित पवार यांचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूर तालुक्यातील कोरेगाव-भीमाच्या ऐतिहासिक लढाईमध्ये शहीद झालेल्या शूरांचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळेच प्रत्येक वर्षी येथे त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही येत असतो. याठिकाणी नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता सरकारच्या वतीने आम्ही पुढाकार घेऊन लोकांना सुविधा देण्यासाठी येथील जागा राज्य सरकार विकसित करणार आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

कोरेगाव भीमानजीक असलेल्या पेरणेफाटा  येथील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना व अभिवादन दिन कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. गृहमंत्री अनिल देशमुख, उर्जामंत्री नितीन राऊत, आमदार अशोक पवार, सुनील टिंगरे आदी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची मानवंदना

सकाळी 6 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विजयस्तंभास मानवंदना दिली. दरम्यान, पेंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइंचे नेते रामदास आठवले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, प्रकाश आंबेडकर यांनी देखील विजयस्तंभाला अभिवादन केले.

प्रशासनाकडून यंदा पास पद्धत

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम जरी प्रतीकात्मक असला तरी या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट नियोजन करण्यात आले होते. कोरोनामुळे या वर्षी मानवंदनेसाठी पास सक्तीचे करण्यात आले होते. ज्यांना पास असेल त्यांनाच मानवंदनेसाठी प्रवेश देण्यात आला.