कार झाडाला धडकून तीन चुलत भावांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव इर्टिगा कारचालकाचा ताबा सुटून रस्त्याकडेच्या झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात आर्वी (ता. कोरेगाव) येथील तीनजण ठार झाले. रहिमतपूर-मसूर मार्गावर सुर्ली गावाजवळील वळणावर रविवारी रात्री दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आज सकाळी आर्वी स्मशानभूमीत तिघांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आर्वीचे माजी उपसरपंच तुकाराम आबाजी माने (वय 65), मुंबई पोलीसमधून निवृत्त झालेले सुभाष कृष्णा माने (वय 60) व निवृत्त भू करमापक तानाजी अनंत माने (वय 62) अशी मृतांची नावे आहेत. खासगी कामानिमित्त हे तिघेजण रविवारी दुपारी इर्टिगा कारमधून वकिलांच्या भेटीसाठी सातारला गेले होते. रात्री नऊच्या आसपास ते सातारहून आर्वीकडे जायला निघाले. रहिमतपूरच्या पुढे मसूर रस्त्याला लागल्यावर तीन किलोमीटर अंतरावरील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने वळण न घेता कार थेट रस्त्याच्या डाव्या बाजूच्या बाभळीच्या झाडावर आदळली. ही धडक इतकी भीषण होती की कारच्या इंजिनचा भाग आत घुसला. या धडकेमुळे मागचा भाग बाजूच्या उताराकडे फिरून झुकला.

अपघाताची माहिती मिळताच, सुर्ली, वाठार किरोली तसेच आर्वी गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, गाडीतील तुकाराम माने व तानाजी माने यांचा जागीच मृत्यू झाला होता. गाडी चालवत असणारे सुभाष माने बोलत होते. तिघांनाही तातडीने सातारा जिल्हा रूग्णालयात आणले गेले. सुभाष माने यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तथापि, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

सुभाष व तानाजी माने हे सख्खे चुलतभाऊ होते, तर तुकाराम माने हे त्यांचे चुलत चुलत भाऊ होते. एका भावकीतील तिघांच्या अपघाती मृत्यूमुळे गावकऱयांनी व्यवहार बंद ठेवले. आज सकाळी आर्वी स्मशानभूमीत तिघांच्या पार्थिवावर एकाच वेळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.