
कोरोना व्हायरसचा जगभरात हाहाकार माजला आहे. सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. हिंदुस्थानातही कोरोनाची 40 जणांना लागण झाल्याचे उघड झाले आहे. अशातच उद्या धुळवड आहे. रंगांची उधळण करण्याचा दिवस आहे, मात्र त्यावर कोरोनाचे सावट आहे. यंदा होळी खेळायची की नाही, असा संभ्रम पडलाय. त्यात भर म्हणून सोशल मीडियावर अफवांच्या पिचकाऱया उडवल्या जात आहेत. अशा वेळी कोरोनाच्या नावाने शिमगा न करता आपला सण साजरा करूया… होळी खेळूया…पण रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून काळजीही घेऊया.
चीनच्या वुहान प्रांतापासून सुरू झालेला कोरोना तब्बल 70 हून अधिक देशांत पसरला आहे. त्याचा वाढता धोका लक्षात घेता अनेकांनी होळी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणचे होळीचे कार्यक्रम रद्द झाले आहेत. कारण गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असते. तसेच होळी खेळताना एकमेकांच्या चेहऱयाला हाताने रंग लावला जातो, ते टाळता येत नाही. त्यामुळे उद्या होळी खेळणार असाल तर खूप खबरदारी घेऊन खेळावी लागेल.
झाड तोडल्यास एक वर्षाची शिक्षा
होळी सण किंवा आणखी कोणत्याही कारणाने वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय झाड तोडल्यास एक वर्षाची शिक्षा होऊ शकते. झाडे न तोडता पर्यावरणपूरक होळी साजरी करा, असे आवाहन पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने केले आहे. झाड तोडल्यास कमीत कमी एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो तसेच कमीत कमी एक हजार ते पाच हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.
होळी दहनाचा मुहूर्त
होळी सोमवारी पहाटे 3 वाजून 3 मिनिटांनी सुरू होणार आहे. ती रात्री 11 वाजून 17 मिनिटांपर्यंत असेल. होलिका दहनाचा मुहूर्त 2 तास 26 मिनिटं आहे. सोमवारी सायंकाळी 6 वाजून 23 मिनिटं ते 8 वाजून 52 मिनिटांपर्यंत होळी दहनाचा शुभ मुहूर्त आहे.
फुगे मारल्यास तुरुंगात जाल
होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी रेल्वे प्रवाशांवर कुणी फुगे मारताना पोलिसांना सापडल्यास त्याला थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. फुगे मारण्याच्या घटना रोखण्यासाठी 17 रेल्वे पोलीस ठाण्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. तिन्ही मार्गांवरच्या काही झोपडपट्टय़ांतून प्रवाशांवर रंग भरलेले फुगे मारले जातात. त्यामुळे प्रवासी जखमी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.
गर्दीच्या ठिकाणी होळी खेळू नका. शक्य असेल तर घरातच कुटुंबीयांसोबत होळी खेळा.
फक्त कोरडे, नैसर्गिक रंग वापरा.
मुलांना पाण्याच्या होळीपासून दूर ठेवा.
अफवांनी घाबरून जाऊ नका. यंदाच्या आपल्या होळीचे रंग जरा वेगळे असतील, हे लक्षात ठेवा.
पारंपरिक सणाचा आनंद घेऊया, पण आपल्या आरोग्याची काळजी घेऊन.
वरळीत ‘कोरोना’सुराला जाळणार
कोरोनारुपी राक्षसापासून सर्वांचे रक्षण व्हावे आणि जगभरातून त्याचा नायनाट व्हावा असे साकडे होलिकामातेला घालण्यासाठी वरळीच्या बीडीडी चाळ क्रमांक 78 आणि 79 येथील वीर नेताजी क्रीडा मंडळाने यंदा कोरोनासुराची भव्य प्रतिकृती उभारली आहे. 55 फुटाचा हा कोरोनासुर तयार करण्यासाठी दहा दिवस मंडळाचे कार्यकर्ते मेहनत घेत होते. सोमवारी या पुतळ्याचे दहन केले जाणार आहे.



























































