
मध्य रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे माटुंगा वर्कशॉपमध्ये काम करणाऱया कृष्णा मोहन वर्मा या टेक्निशियनचा अपघातात बळी गेला आहे. त्यामुळे रेल कामगार सेनेसह सर्वच कामगार संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी माटुंगा वर्कशॉपमध्ये ‘काम बंद’ आंदोलन छेडले आहे. सुरक्षा उपकरणांशिवाय कामगारांना धोक्याची कामे करण्यास भाग पाडणाऱया, त्यांची छळवणूक करणाऱया अधिकाऱयांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
माटुंगा वर्कशॉपमध्ये कृष्णा मोहन वर्मा टेक्निशियन म्हणून कार्यरत आहेत. रविवारी सुट्टीचा दिवस असताना वर्कशॉपच्या अधिकाऱयांनी त्यांना जबरदस्तीने कामावर बोलवले होते. यावेळी त्यांनी हायड्रोलिक क्रेनवर चढून 20 फूट उंचीवरील क्रेनचे काम करण्याचे निर्देश संबंधितांनी दिले खरे, पण त्यांना कोणतीही सुरक्षा उपकरणे पुरवली नव्हती. त्यामुळे काम करत असताना कृष्णमोहन आणि त्यांचा सहकारी मधुकर हिवराळे कोसळले. त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाल्याने सकाळी 11 वाजता त्यांना भायखळा रेल्वे रुग्णालयात दाखल केले, मात्र वर्मा गंभीर जखमी झाल्याने त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान रविवारी दुपारी त्यांचे निधन झाले.
रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने घेतली सीएमईची भेट
कामगारांच्या सुरक्षेबाबत प्रशासन उदासीन असल्याने माटुंगा वर्कशॉपमध्ये वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. गेल्या दोन महिन्यांत क्रेनवर काम करत असताना सहा अपघात घडले आहेत, मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने रविवारचा अपघात घडला आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत, कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्य यांत्रिक अभियंता (सीएमई) सुनीलकुमार गुप्ता, माटुंगा मुख्य कारखाना प्रबंधक परिमल शिंदे यांची भेट घेत कामगारांच्या सुरक्षेबाबत सर्व उपाययोजना करण्यात यावी ही मागणी करण्यात आली. तसेच सुरक्षेशी खेळणारे आणि माटुंगा वर्कशॉपमधील अपघाताला कारणीभूत असलेले कारखाना प्रबंधक रोहितकुमार रजपूत यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली. निलंबन होईपर्यंत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला. तसेच रजपूत हे वेळोवेळी कामगारांना छळत असल्याचेही निदर्शनास आणले. यावेळी शिष्टमंडळात अर्जुन जामसांडेकर, सूर्यकांत आंबेकर, संदेश मलुष्टे, चंद्रकांत विनरकर, संजय चिपकर, क्लिफर्ट डिसोझा, शशिकांत काळे, मंगेश जोशी, दत्ता आदाटे, बाळा शिरीषकर, परशुराम राणे, मिलिंद पाटील, शिल्पा म्हात्रे, चिंतामणी निखार्गे, विनोद ठाकूर आदी उपस्थित होते.
माटुंगा वर्कशॉपमध्ये दहा वर्षांपूर्वी जवळपास आठ हजार कामगार होते, मात्र आता केवळ चार हजार कामगार असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ नोकर भरती करावी अशी मागणी रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर देव यांनी केली आहे.


























































