अरविंद केजरीवाल यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर कुमार विश्वास यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून कवी कुमार विश्वास यांनी ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय गृह मंत्रालयाने कुमार विश्वास यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत कुमार विश्वास यांनी केलेल्या वक्तव्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आम आदमी पक्षाचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी नुकताच असा दावा केला होता की, अरविंद केजरीवाल एकदा आपल्याला म्हणाले होते की, ते पंजाबचे मुख्यमंत्री होणार किंवा स्वतंत्र राष्ट्र खलिस्तानचे पंतप्रधान होणार, असे केजरीवाल यांच्याबाबतचे वक्तव्य विश्वास यांनी नुकतेच केले होते. त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कुमार विश्वास यांचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अरविंद केजरीवाल यांना पंजाबची सत्ता मिळवायची आहे. एकदा केजरीवाल आपल्याला म्हणाले होते की, त्यांना पंजाबचे मुख्यमंत्री बनायचे आहे किंवा स्वतंत्र राष्ट्राचे (खलिस्तान) पंतप्रधान बनायचे आहे. कुमार विश्वास यांच्या या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे.

कुमार विश्वास यांच्या या वक्तव्यातील दाव्याचा तपास करण्याची मागणी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. राजकारण ही वेगळी बाब आहे. मात्र, फुटीरतावादाची मोठी किंमत पंजाबने चुकवली आहे. त्यामुळे हे वक्तव्य गंभीर असून त्याची निष्पक्षपातीपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी चन्नी यांनी केली आहे. याची चौकशी करून पंतप्रधानांनी पंजाबच्या जनतेची चिंता दूर करावी, असे आवाहनही चन्नी यांनी केले आहे.

चन्नी यांच्या मागणीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे की, एखाद्या राजकीय पक्षाने देशविरोधी, फुटीरतावादी आणि बंदी असलेल्या संस्थेशी संपर्क ठेवणे तसेच निवडणुकीसाठी त्यांची मदत घेणे देशाच्या अखंडतेच्या दृष्टीने गंभीर आहे. देशाचे शत्रू आणि अशा पक्षांचा अजेंडा एकच आहे. पंजाबची सत्ता मिळवण्यासाठी एखाद्या पक्षाने या स्तराला जाणे निषेधार्ह असल्याचेही शहा यांनी म्हटले आहे.