कर्नाटकमधील खातेवाटपाचा पेच सुटला, जेडीएसला अर्थ, तर काँग्रेसला गृह मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर जेडीएसचे (जनता दल सेक्युलर) सरकार स्थापन झालेले आहे, पण या सरकारमध्ये महत्त्वाच्या खात्यांच्या वाटपावरून निर्माण झालेला पेच अखेर सुटला आहे. आता उभय पक्षांतील करारानुसार जेडीएसला अर्थ, तर काँग्रेसला गृह खाते मिळणार आहे अशी माहिती दोन्ही पक्षांतील सूत्रांनी दिल्लीत पीटीआयला दिली.

दोन्ही पक्षांतील सत्तावाटपाच्या करारास अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. दोन्ही पक्षांत खात्यांचे वाटप समाधानकारक व्हावे यासाठी गेल्या ३० मेपासून चर्चेच्या पाच फेऱया दिल्लीत झाल्या. या चर्चेत दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते अशी माहितीही सूत्रांनी दिली.

यूपीएच्या चेअरमन सोनिया गांधी यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेरिकेत गेलेले असले तरी त्यांनी अमेरिकेतून आपल्या पक्षाच्या नेत्यांशी फोनवरून या खातेवाटपाबाबत चर्चा केली. जेडीएसला अर्थ तर काँग्रेसला गृह खाते देण्याचा निर्णय झाला असे जेडीएसचे नेते डॅनिश अली यांनी दिल्लीत सांगितले. आपण बंगळुरूला गेल्यानंतर मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची भेट घेणार असल्याचे अली यांनी सांगितले.