
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत असतानाही उत्तराखंड येथे कुंभ मेळ्याचं आयोजन करण्यात आलं. कुंभ मेळ्यासाठी हरिद्वार येथे आलेल्या साधूसंतापैकी काही जण कोरोनाने बाधित असल्याचं उघडकीस आलं आहे. हा कोरोना कोणी पसरवला? या परिस्थितीला जबाबदार कोण? यावरून साधू-संतांच्या आखाड्यांमध्ये आरोप,प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. बैरागी आखाड्याने कोरोना पसरवण्यासाठी संन्यासी आखाडा जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
कुंभ मेळ्यात कोरोना पसरण्यासाठी बैरागी आखाडा जबाबदार असल्याचा सुरुवातीला आरोप करण्यात आला होता, हे आरोप फेटाळून लावत बैरागी आखाड्याने कोरोनाच्या फैलावासाठी संन्यासी आखाडा जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. या दोन आखाड्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असतानाच निर्मोही आखाड्याचे अध्यक्ष महंत राजेंद्र दास यांनी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी हे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे काही आखाड्यांनी त्यांच्याकडून कुंभ मेळ्याच्या समाप्तीची घोषणा केली आहे.
14 एप्रिल रोजी कुंभ मेळ्यातील शाही स्नान पार पडले. यानंतर कुंभमेळ्यासाठी हरिद्वार येथे आलेल्या 50 साधूंना कोरोना झाल्याचे निदान करण्यात आले आहे. गेल्या 24 तासात जुना निरंजनी आखाडा आणि आव्हान आखाड्यातील काही साधूंना कोरोनाची लागण झाल्याचं कळालं आहे. हरिद्वार प्रशासनाने कोरोना चाचण्यांचा वेग वाढवल्याने कोरोनाबाधितांचे क्षणाक्षणाला वाढत जाणारे आकडे दिसायला लागले आहेत.
हिंदुस्थानात कोरोनाबाधितांची संख्या दिवसाला 2 लाखांच्या घरात पोहोचली आहे. कोरोनाचा फैलाव वाढत असतानाही कुंभ मेळ्याचं आयोजन करण्यात आल्याने त्यावर बरीच टीका करण्यात आली होती. कुंभ मेळ्यात सहभागी झालेल्या निरंजनी आखाड्याने त्यांच्यासाठी कुंभमेळा समाप्त झाल्याची घोषणा केली आहे. निरंजनी आखाड्यातील कोरोनाबाधित साधूंची संख्या वाढत चालली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 14 एप्रिलचे शाही स्नान हे आमच्यासाठी महत्वाचे होते. हे शाही स्नान पूर्ण झाले असून आमच्यासाठी कुंभ मेळ्याची समाप्ती झाली असल्याचे निरंजनी आखाड्यातर्फे सांगण्यात आले आहे.
हरिद्वार येथे आयोजित करण्यात आलेला कुंभ मेळा 30 एप्रिलपर्यंत चालणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे काही आखाड्यांनी वेळेआधीच कुंभ मेळ्याची त्यांच्यासाठी समाप्ती झाल्याचे घोषित करायला सुरुवात केल्याने कुंभ मेळा वेळेआधीच संपणार का ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. उत्तराखंडच्या सरकारने कुंभ मेळा हा 30 एप्रिलपर्यंत चालणार असल्याचं घोषित केलं होतं. या पार्श्वभूमीवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांनी शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीमध्ये हरिद्वारमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. आजतक या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर याबाबतची बातमी प्रसिद्ध करण्यात आले आहे.





























































