दहावीनंतर कुठलं करिअर निवडायचं? कुंडली करते मार्गदर्शन

771

anupriya-desai-astrologer>> अनुप्रिया देसाई, ज्योतिष-वास्तू विशारद

दहावीच्या परीक्षा झाल्या आणि पालक मुलांच्या कुंडल्या घेऊन यायला सुरवात झाली. गेल्याच आठवड्यात सुयशचा फोन आला होता. मुलीच्या कुंडलीबाबत भेटायला कधी येऊ हा त्याचा प्रश्न. मुलीची दहावीची परीक्षा झालीये आता पुढे काय हा मोठा प्रश्न घेऊन सुयश, त्याची पत्नी आणि मुलगी माझ्याकडे आले. सुयश आणि त्याची पत्नी नावाजलेल्या IT कंपनीत उच्च पदावर. मुलीच्या कुंडलीत शुक्र वृषभ राशीत आणि रोहिणी नक्षत्रात. वृषभ लग्नाची कुंडली. चंद्र सुद्धा वृषभ राशीतच. पुढील येणाऱ्या दशा पाहता मुलगी कलेचे शिक्षण घेऊन त्यात प्रगती करेल असे दिसते. त्यामुळे तिला School Of Art मध्ये Graphic Designer किंवा Photography चे शिक्षण द्यावे असे कुंडली सांगतेय. सुयशला तसे सांगितल्यानंतर त्याचा थोडा हिरमोड झाला कारण त्यांना Art ह्या शिक्षणाबद्दल कसलीही कल्पना नव्हती. त्यांना मुलीने IT किंवा तत्सम क्षेत्रातच शिक्षण घेऊन एक निश्चित भविष्य बनवावे अशी इच्छा. परंतु माझे बोलणे ऐकल्यावर मुलीची कळी लगेच खुलली. तिला फोटोग्राफीत खूप इंट्रेस्ट आहे. तिला त्यातच शिक्षण घ्यायचे आहे. परंतु आई -बाबांपुढे ती काही बोलू शकत नव्हती. सुयश आणि त्याच्या पत्नीला समजावले. कुंडली जरी कलेचे शिक्षण घ्या हे सांगत असली तरी तुम्ही Aptitude Test करून घ्या म्हणजे खात्री होईल. त्याप्रमाणे त्यांनी ती Test करून घेतली आणि त्या analysis मध्ये सुद्धा कलेचे म्हणजेच फोटोग्राफी, इंटिरियर डिझायनींगचे शिक्षण घेण्याबाबत सुचवले होते. म्हणजेच मुलीचा कल कुठे आहे हे Aptitude Test ने आणि कुंडलीने अचूक दर्शवले होते. त्यानंतर हे दांपत्य पुन्हा भेटण्यास आले तेंव्हा सुयशच्या पत्नीने मुलीला लहानपणापासूनच चित्रकला, क्राफ्ट ह्याची किती आवड आहे हे सांगत होती.

आता दहावीच्या निकालानंतर तिला ह्या क्षेत्रात शिक्षण घेऊ द्यावे ह्यांवर दोघांचे एकमत झाले. त्यांना तिच्या पुढील शिक्षण आणि करिअर संदर्भात मार्गदर्शन केले. कारण हे शिक्षण घेऊन ती आर्थिक दृष्ट्या सक्षम असेल का? ही काळजी सुयशच्या पत्नीने दर्शवली. अर्थात प्रत्येक पालकाची हीच इच्छा असते की आपल्या मुलांनी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असावे आणि त्यात काही गैर नाही. तिच्या येणाऱ्या पुढील महादशा आर्थिक दृष्ट्या तिला फायदेशीर ठरणार आहेत हे त्यांना सांगितले. समाधानाने दोघांनी माझा निरोप घेतला.

अशीच एक कुंडली आली होती 10 वर्षांपूर्वी. बुध शनिच्या मकर राशीत. शनि तूळेचा. Financeचा कारक ग्रह गुरु शनिच्या अनुराधा नक्षत्रात. रवि कुंभेचा. सगळीकडे बुध, गुरु आणि शनि combination. हे सर्व C.A. च्या शिक्षणासाठी उपयुक्त वाटत होते. पुढील महादशा सुद्धा रविचीच. खात्री करावी म्हणून दशमांश कुंडलीसुद्धा तपासली. दशमांशावरून जातकाच्या करिअरची कल्पना येते. ह्या दशमांश कुंडलीतही बुध आणि गुरु धनु (गुरुची राशी) राशीत,शनि मकरेत दशम स्थानात. आज ती मुलगी C.A. चे शिक्षण पूर्ण करून नावाजलेल्या फर्ममध्ये पार्टनर आहे.

वकील किंवा L.L.B. चे शिक्षण घेण्यासाठी शनि, राहू,बुध,मंगळ ह्यांचं combination चांगलं असावं. शनि म्हणजे सातत्य किचकट अभ्यास. कायद्याचा अभ्यास हा खूप किचकट आहे. राहू हा ग्रह imagination किंवा illusion चा कारक आहे. सत्य -असत्यचा आभास म्हणजे राहू. त्यामुळे हा ग्रह सुद्धा कुंडलीत दमदार असावा. बुध हा common sense आणि वाणीचा कारक. वकिलांना त्यांचा कॉमन सेन्स सतत जागृत ठेवावा लागतो. मंगळ कुरघोडी करणारा ग्रह. त्यामुळे तो तर हवाच. ह्या combination बरोबर चंद्रही खंबीर असावा. तर यश तुमचेच. बऱ्याचशा वकिलांच्या कुंडलीत हेच combination मिळाले आहे.

कुंडलीतल्या ग्रहांच्या combinations वरून मुलांचा शैक्षणिक कल लक्षात नक्कीच येतो. त्यांचा स्वभाव,त्यांची ग्रहणशक्ती,आकलनशक्ती आणि जे समजलंय ते उत्तरपत्रिकेत व्यवस्थित मांडण्याचं कौशल्य हे आपण कुंडलीवरून नक्कीच जाणून घेऊ शकता. पुढील महादशा तिला तिने घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग होणार किंवा नाही ह्याबद्दल मार्गदर्शन करतात. काहीवेळेस असेही पाहण्यात येते की शिक्षण डॉक्टरकीचे परंतु करिअर अॅक्टिंगमध्ये. नावाजलेल्या नावांपैकी निलेश साबळे, श्रीराम लागू, काशिनाथ घाणेकर, गिरीश ओक. सर्वांचेच करिअर खूप दमदार आहे. तुमच्या मुलांच्या बाबतीतही असेच आहे का हे पडताळून पाहता येईल.

चार ते पाच वर्षांपूर्वी माझ्याकडे एक डॉक्टर आल्या होत्या. नुकतंच वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून मुंबईच्या नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये त्यांची प्रॅक्टिस सुरू होती. पुढे कुठले शिक्षण घेऊ ह्यांवर मार्गदर्शनासाठी आल्या होत्या. कुंडलीतील केतू, गुरु, मंगळ आणि महादशा हे बघून Oncology करावी असा सल्ला दिला होता. त्यांचीही तीच इच्छा होती. त्यांनी त्यात शिक्षण घेऊन आज त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे.

मागे एका केसमध्ये मुलाला राहू महादशा होती त्यावर article लिहिले होते. राहू महादशेत मुलांचे अभ्यासातील लक्ष विचलित होते असे observation आहे. मुलाची आई कुंडली घेऊन आली होती. मुलाला वडील नाहीत त्यामुळे धाक असा नाहीच. त्यात मुलगा वाया जातो की काय ही त्या माऊलीला काळजी. तेंव्हा कुंडलीच्या अभ्यासावरून ह्या मुलाला काही instrumentsची आवड आहे का म्हणून विचारले होते. तेव्हा त्याच्या आईने कॅसिओ खूप चांगल्या प्रकारे वाजवतो ही माहिती दिली होती. कलेच्या शिक्षणासाठी राहू तर नक्कीच वरदान ठरेल. कारण राहू महादशा असते 18 वर्षांसाठी. ह्या 18 वर्षात मुलाने काही शिक्षणच घेऊ नये का? तर नाही. राहुशी निगडीत आणि त्याच्या कुंडलीच्या अभ्यासाने त्याला एखाद्या क्षेत्रात नक्कीच यश मिळू शकेल. मग ह्याला कॅसिओमध्ये शिक्षण घेण्यास सांगितले. सध्या कॅसिओ वाजवण्यासाठी काही प्रोग्राम अथवा आर्केस्ट्रामध्ये जातो.

हल्ली करिअरचे ऑपशन्स खूप जास्त आहेत. 20 वर्षांपूर्वी टी. व्ही. सिरिअल्स एवढ्या चालतील आणि त्यामुळे बऱ्याच अॅक्टर्स, डायरेक्टर्स, प्रोड्युसर्स, स्क्रिप्ट लिहिणाऱ्यांना, मेकअप आर्टिस्ट, एडिटर ना scope आहे असे सांगितले असते तर विश्वास बसला नसता. फक्त ह्यांच क्षेत्रात असे चित्र नसून मेडिकलमध्येही Oncology (कँसर स्पेशियालिस्ट), IVF शी निगडीत शिक्षण घ्यावे असे वाटलेही नसेल परंतु आज ह्या डॉक्टर्सकडे प्रचंड गर्दी असते. सामान्य लोकांना ह्या स्पेशियालिस्ट डॉक्टर्सची गरज आहे.

तुमच्या मुलाची कुंडली काय सांगते हे नक्की तपासून पहा. कारण काही वेळेस पालकांच्या अट्टाहासामुळे मुलं सायन्स करू पाहतात परंतु अकरावीतच अभ्यास झेपत नाही ह्या कारणावरून मग कॉमर्सकडे वळवले जाते. आधीच जर कल्पना आली तर तुमचा आणि तुमच्या पाल्याचा वेळ नक्की वाचेल. पहा विचार करून !!

कसा वाटला हा लेख? प्रतिक्रिया जरूर कळवा – [email protected]

संपर्कसाठी मोबाईल क्रमांक- ९८१९०२१११९ (फक्त संध्याकाळी ६ ते ८ या वेळातच फोन करणे)

आपली प्रतिक्रिया द्या