
अभिषेक भटपल्लीवार, गडचिरोली
दिवाळीच्या सणानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रथा-परंपरा बघायला,ऐकायला मिळतात. गडचिरोलीजवळच्या अडपल्ली गावामध्ये एक वेगळीच परंपरा बघायला मिळाली आहे. इथे लग्नानंतर पहिल्या दिवाळी सणाला सासरी जाणाऱ्या जावयांचे विविध प्रकारे मानपान केले जाते आणि नंतर त्यांना थेट कुस्तीच्या आखाड्यात उतरवले जाते. या परंपरेला जावयाची कुस्ती असं नाव पडलं असून या गावचा एकही जावई या परंपरेपासून सुटलेला नाही.
अडपल्ली येथे दिवाळीच्या पाडव्याला म्हणजे बलिप्रतिपदेच्या दिवशी ही स्पर्धा खेळवली जाते. जावयांची ही कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी संपूर्ण गाव एकवटतं. वर्षभरात गावातील ज्या मुलीचे लग्न झाले, तिच्या पतीला म्हणजेच जावयाला पहिल्या दिवाळीसाठी रितसर निमंत्रण दिले जाते. जावई व मुलीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गावात आणले जाते. त्यांना नवीन कपडे घेतले जातात. बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गाई-म्हशींची पूजा करून गाई-म्हशी मोकळ्या जागेत नेली जातात. याच मोकळ्या जागेवर वर दुपारच्या सुमारास जावयांच्या कुस्तीची स्पर्धा रंगते. ही स्पर्धा जिंकण्यासाठी किंवा कोणाला हरवण्यासाठी नसते मात्र या स्पर्धेमुळे गावकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन होते. कुस्ती संपल्यानंतर गावातून मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीतून सगळ्या जावयांना त्यांच्या सासऱ्याच्या घरी पोहोचवले जाते. जर गावात एकही जावई नसेल तर मग गावातल्या युवकांमध्येच कुस्तीची स्पर्धा आयोजित केली जाते. अडपल्ली येथील भोयर कुटुंबातील सदस्य या स्पर्धेसाठी पंचाची जबाबदारी पार पडतात.































































