
कोरोना आजाराची लागण होऊ नये यासाठी शासन आणि आरोग्य विभागातर्फे जनजागृती केली जात आहे. या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून तोंडाला मास्क वापरण्याचा आणि हात धुण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. त्यामुळे मास्कच्या आणि सॅनिटायझरच्या विक्रीत अचानक वाढ झाली असून पेण तालुक्यातील अनेक मेडिकलमध्ये मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा झाला आहे.
चीनसह जगभरात झपाट्याने पसरत असल्याने कोरोना आजाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हिंदुस्थानही या आजाराने बाधित रुग्णांची संख्या 100 वर पोहोचली आहे. तर पेण येथून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पनवेल येथे 1 आणि पुणे येथे 5 रुग्ण आढळल्याने सतर्कता बाळगली जात आहे. दरम्यान कोरोना आजारामुळे डेटॉल मास्क आणि सॅनिटायझरच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पेण तालुक्यात मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा झाला असून याला पेणमधील औषध विक्रेत्यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे.






























































