आमची हद्द सोडा, तुमच्या क्षेत्रात जा! हिंदुस्थानी जवानांकडून चिन्यांची ‘कानउघाडणी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्व लडाखच्या सीमेवर कुरापती सुरू ठेवणाऱया चीनच्या सैन्याची चांगलीच कानउघाडणी करण्यासाठी हिंदुस्थानी जवानांनी आता लाऊडस्पीकर्स आणि बॅनर्सचा वापर सुरू केला आहे. मुकाटय़ाने आमची हद्द सोडा आणि वास्तविक नियंत्रण रेषेपलिकडील (एलओसी) आपल्या क्षेत्रात जा, अशी सक्त ताकीद हिंदुस्थानी जवान देत आहेत. त्यावर चीनचे सैन्यही लाऊडस्पीकर्स आणि बॅनर्सच्याच माध्यमातून हिंदुस्थानच्या जागेवर आपला दावा सांगू लागले आहेत.

चीन एकीकडे शांतीचा दिखावा करीत असताना दुसरीकडे त्यांचे सैन्य पूर्व लडाखच्या सीमेवरच अडून बसले आहे. या सैन्याला माघारी पाठवण्यासाठी पॅन्गॉग लेक परिसरात तैनात असलेल्या हिंदुस्थानी जवानांनी लाऊडस्पीकर आणि बॅनर्स वापरण्यास सुरुवात केली आहे. उभय देशांमधील शांततेचे संबंध कायम राखण्यासाठी मागे जा, तुम्ही हिंदुस्थानच्या हद्दीत आहात, असे चीनच्या सैन्याला लाऊडस्पीकर आणि बॅनर्सच्या माध्यमातून बजावले जात आहे. त्यावर आम्ही आमच्याच हद्दीत आहोत. शांतता हवी असेल तर दोन्ही देशांनी समान अंतराची माघार घेतलीच पाहिजे, असे उर्मट प्रत्युत्तर चीनमधील पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैन्यांनी दिले आहे. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांच्या गुप्तचर शाखेतील वरिष्ठ अधिकाऱयांनी ही माहिती दिली.

1962 च्या युद्धावेळीही लाऊडस्पिकर्स वापरले होते!

1962 साली हिंदुस्थान आणि चीनमध्ये झालेल्या युद्धावेळीही दोन्ही देशांकडून लाऊडस्पिकर्सचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे, त्यावेळी चीनच्या सैन्याने लाऊडस्पीकरवर मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांची गाणी ऐकवली होती. अशा माध्यमातून हिंदुस्थानी लष्कराला माघार घेण्याचे आवाहन केले गेले होते. लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने या आठवणीला उजाळा दिला.