
पाकिस्तान आणि चीनच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुस्थानचे लष्कर आता लडाख सीमेवर केगाने कूच करू शकणार आहे. सरकारने मनालीपासून लेहपर्यंत नवीन रस्ता बनवण्याच्या योजनेवर काम सुरू केले आहे. या रस्त्यामुळे लष्कर पाकिस्तान व इतर शत्रू राष्ट्रांच्या नजरेत न येता त्या राष्ट्रांवर हल्ल्यासाठी शस्त्र आणि जवान तैनात करू शकणार आहे. तसेच मनालीपासून लेहपर्यंतच्या प्रवासाचा वेळ तीन ते चार तासांनी वाचणार आहे.
हिंदुस्थान गेल्या तीन वर्षांपासून दौलत बेग ओल्डी परिसराला युद्धाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तरी सब-सेक्टरना जोडण्यासाठी पर्यायी मार्गांच्या योजनेवर काम करीत आहे. जगातील सर्वात उंच व्हेईकल रोड खारदुंगला येथून रस्त्याचे काम सुरू झाले आहे. सरकारी यंत्रणांनी आता मनालीपासून लेहसाठी निमू-पदम-दरचा या विभागांना जोडत नवीन पर्यायी रस्ता बनवण्याच्या योजनेवर काम सुरू केले आहे. हा रस्ता उंचावरील लडाखला उर्वरित हिंदुस्थानला जोडणारी तिसरी मार्गिका ठरणार आहे. या रस्त्यामुळे लष्कराचे जवान हल्ल्यासाठी शत्रूची नजर चुकवत वेगाने लडाखच्या सीमेवर पोहोचणार आहेत. जवानांचे तीन ते चार तास वाचणार आहेत.
– लष्कराला सध्या श्रीनगरच्या जोजिला येथून लडाखला जावे लागते. हा रस्ता द्रास-कारगील मार्गे लेहपर्यंत पोहोचतो. 1999 च्या कारगील युद्धात पाकिस्तानने याच मार्गाला निशाणा बनवत बॉम्बस्फोट केले होते.
– गेल्या चार महिन्यांपासून चीनबरोबर सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानने लडाख सीमेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. सरकार आता या प्रांतात दिर्घ काळाच्या नियोजनाने काम करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काही दिवसांपूर्वीच लडाखचा दौरा केला होता. त्यावेळी ते निमू बेसवरही गेले होते.



























































