
लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज लेहमध्ये हिंसक वळण लागले. आंदोलक विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. आंदोलक भडकले आणि हिंसाचार सुरू झाला. या हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर गेल्या 15 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण सोडले आहे.
VERY SAD EVENTS IN LEH
My message of peaceful path failed today. I appeal to youth to please stop this nonsense. This only damages our cause.#LadakhAnshan pic.twitter.com/CzTNHoUkoC— Sonam Wangchuk (@Wangchuk66) September 24, 2025
लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आंदोलन करत उपषोण सुरू केले होते. गेल्या 15 दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू होते. पण आज या आंदोलनाला लेहमध्ये हिंसक वळण लागले. आंदोलक विद्यार्थ्यांची पोलीस आणि सुरक्षादलांच्या जवानांशी झटापट झाली. यामुळे आंदोलक विद्यार्थी आक्रमक झाले. त्यांनी भाजपच्या कार्यालयाला आग लावली. तसेच पोलीस आणि सुरक्षा दलांच्या जवानांवर दगडफेक करत सीआरपीएफची गाडीही पेटवून दिली. या हिंसाचाराच्या घटनेनंतर सोनम वांगचुक यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे. वांगचुक यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून हा संदेश जारी केला.
आज उपोषणाच्या 15 व्या दिवशी लेह शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड झाल्याचे सांगताना खूप दुःख होत आहे. अनेक कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आणि पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. पण गेल्या 35 दिवसांपासून उपोषण करणाऱ्यांपैकी दोघांची प्रकृती काल गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यामुळे आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला. आज संपूर्ण लेहमध्ये बंदची हाक देण्यात आली. आज संपूर्ण तरुण पिढी हजारोंच्या संख्येने बाहेर आली, असे वांगचुक म्हणाले.
काहींना वाटते की ते आमचे समर्थक होते. मात्र, संपूर्ण लडाखचे आम्हाला समर्थन आहे. तरुणांमध्ये रोष होता म्हणून रस्त्यावर उतरले. एक प्रकारे ही Gen Z क्रांती आहे. गेल्या पाच वर्षांपासून तरुण बेरोजगार आहेत. एकामागून एक सबबी देऊन त्यांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवले जात आहे. आणि लडाखला संरक्षण नाकारले जात आहे. कुठलेही कामकाज नसल्याने तरुणांमध्ये आणि समाजात अस्वस्थता निर्माण केली जात आहे. आज येथे कुठलीही लोकशाही व्यवस्था नाही, असे वांगचुक म्हणाले. तसेच शांततेच्या मार्गाने चालण्याचा माझा संदेश अपयशी ठरला आहे. कृपया हा मूर्खपणा थांबवा. यामुळे फक्त आपल्या ध्येयाचे नुकसान होत आहे, असे आवाहन सोनम वांगचुक यांनी तरुणांना केले आहे.