
कौटुंबिक वादातून महिला पोलीस कॉन्स्टेबलने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कसबा बावडा पोलीस लाईनमधील आज दुपारी ही घटना उघडकीला आली. घटनास्थळी मिळालेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली असून, या घटनेची नोंद करण्याचे काम शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
योगिनी सुकुमार पोवार (वय 33, मूळ रा. पिंपळगाव, ता. कागल) असे मृत कॉन्स्टेबलचे नाव आहे. योगिनी पोवार सध्या पोलीस मुख्यालयात कर्तव्य बजावत होत्या. त्यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मूळचे करवीर तालुक्यातील भाटणवाडी येथील त्यांचे पती विकास हे खासगी नोकरी करतात. सासू-सासरे सध्या मुंबईला असतात.
सकाळपासून फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही फोन उचलत नसल्याने त्यांचे वडील एका मित्राच्या दुचाकीवरून आज पोलीस लाईन येथील मुलीच्या घरी गेले. घराला आतून कडी होती. हाकेला प्रतिसाद मिळत नसल्याने, शेजाऱयांच्या मदतीने घराच्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता, योगीनी यांनी तुळईला ओढणीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, गृहपोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील आदी पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट दिली. आत्महत्येपूर्वी पोवार यांनी लिहून ठेवलेली एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये पती व सासूकडून त्रास दिला जात असल्याची माहिती पुढे येत असून, त्याची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘सीपीआर’मध्ये शवविच्छेदन करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक सुनीता शेळके तपास करीत आहेत.



























































