
सामना ऑनलाईन । हावडा
रेल्वेच्या छपरावर बसून प्रवास करू नका असं सांगूनही अनेक जण ट्रेनवर चढतात. कधीकधी अशा प्रसंगांमध्ये जीवसुद्धा जाऊ शकतो. पण, तरीही अनेक जण असा धोकादायक प्रवास करतात. पश्चिम बंगालमध्ये एका महिलेने विवस्त्रावस्थेत ट्रेनच्या छपरावर चढल्याची घटना घडली आहे. पण, विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला आहे.
पश्चिम बंगालमध्ये चुंचुडा रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सकाळी साडे आठच्या सुमारास हावडा लोकल उभी होती. एका विक्षिप्त महिला लोकल ट्रेनच्या छपरावर चढली आणि पळू लागली. लोकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. पण, महिला धावत होती आणि धावता धावता ती मोटरमनच्या डब्यावरच्या पेंटाग्राफला आपटली. काही कळायच्या आतच तिला विजेचा धक्का लागला आणि ती त्यात होरपळून निघाली.
या घटनेनंतर चुंचुडा रेल्वे स्थानकावर गोंधळ माजला. स्थानकावरचा विद्युतप्रवाह थांबवण्यात आला. कारण, या घटनेमुळे हावडा-बर्द्धमान या मार्गावरची रेल्वेसेवा ठप्प झाली. कर्मचाऱ्यांनी तिचा मृतदेह ट्रेनवरून उतरवला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.



























































