पाकिस्तानमध्ये हिंदू तरुणीची बलात्कारानंतर हत्या

पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील लरकाना येथील दंतमहाविद्यालयाच्या वसतिगृहातील रुममध्ये मृतावस्थेत आढळलेल्या हिंदू तरुणीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. निमृता कुमारी असे तिचे नाव आहे. 16 ऑक्टोबर रोजी रुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत निमृताचा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन अहवालात हत्येपू्र्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार कऱण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

निमृता बेनझीर भुट्टो मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये डेंटल सर्जरी (बीडीएस)चा अभ्यासक्रम शिकत होती.१६ ऑक्टोबरला ती लेक्चरला आली नाही. म्हणून तिच्या मैत्रिणी तिच्या रुमवर गेल्या. पण निमृता दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी प्राध्यापकांना कळवले. त्यानंतर दरवाजा तोडल्यानंतर निमृताचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. सुरुवातीला ही आत्महत्या असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र शवविच्छेदनात निमृतावर मृत्यूआधी लैंगिक अत्याचार झाल्याचे व त्यानंतर गळफास लावून तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या