Lakhimpur Kheri आरोपी मंत्रीपुत्राला जामीन, निवडणुकीच्या धामधुमीत आशीष मिश्रा तुरुंगाबाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभर गाजलेल्या लखीमपूर खेरी हत्याकांडातील आरोपी व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशीष मिश्राला अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. आंदोलक शेतकऱयांना गाडीखाली चिरडण्याच्या प्रकरणात तो मुख्य आरोपी आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत त्याला जामीन मंजूर झाला असून 130 दिवसांनंतर तो तुरुंगातून बाहेर येणार आहे.

गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला लखीमपूर खेरीमध्ये कृषी कायद्यांच्या निषेधार्थ शेतकरी रस्त्यावर उतरले होते. यादरम्यान आशीष मिश्राने शेतकऱयांना भरधाव गाडीखाली चिरडल्याचा आरोप आहे. तो पूर्वनियोजित कट होता, असा पोलिसांचा दावा असून या प्रकरणात आशीष मिश्राला 9 ऑक्टोबरला अटक केली होती. त्यानंतर त्याने जामीन अर्ज केला होता. त्यावर सुनावणी करून न्यायालयाने 18 जानेवारीला निर्णय राखून ठेवला होता. तो निर्णय गुरुवारी जाहीर करीत न्यायमूर्ती राजीव सिंह यांनी आशीष मिश्राला जामीन मंजूर केला.

मोदीजी, काही नैतिकता आहे की नाही – प्रियंका गांधी

आशीषला जामीन मिळाल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदीजी, देश, देशवासीय व शेतकऱयांप्रति आपली काही नैतिक जबाबदारी आहे की नाही? तुमच्या मंत्र्याच्या मुलाने शेतकऱयांना चिरडले. त्या मंत्र्याचा तुम्ही राजीनामाही घेतला नाहीत? आता मंत्रीपुत्राला जामीन मिळाल्याने तो मोकाट फिरेल, असे ट्विट प्रियंका यांनी केले आहे.

n आशीष मिश्राला तुरुंगाबाहेर येण्यासाठी आणखी एक-दोन दिवस लागणार आहेत. लखनौ खंडपीठाने त्याला जामीन मंजूर केला आहे, मात्र आदेशाची प्रत मिळालेली नाही. ती प्रत मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल. त्यात एक-दोन दिवस जातील, असे मिश्राचे वकील अवधेश सिंह यांनी सांगितले.