
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाने रविवारी लखीमपूर खेरी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखवणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली. या घटनेत 8 शेतकरी ठार झाले. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये संतापाचा आगडोंब उसळला आणि जाळपोळ झाली.
या घटनेत चार भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचं अजय मिश्रा यांचा मुलगा अभिषेक याचं म्हणणं होतं. पण, या चार कार्यकर्त्यांमध्ये एक पत्रकार असल्याचा खुलासा झाला आहे. या पत्रकाराच्या कुटुंबीयांनी मिश्रा पितापुत्राच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
या पत्रकाराचं नाव रमण कश्यप असं आहे. रमण हा एका स्थानिक वृत्तवाहिनीचा वार्ताहर म्हणून काम करत होता. रविवारी जेव्हा ही घटना घडली तेव्हा तो वार्तांकनासाठी घटनास्थळी हजर होता. ही घटना घडल्यानंतर तो बेपत्ता झाल्याने त्याच्या कुटुंबाने त्याचा शोध घेतला. तेव्हा या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याचं त्यांना कळलं.
या प्रकरणी रमणचे वडील रामआश्रय कश्यप यांनी निघासन येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, रमण हा भाजप कार्यकर्ता असल्याची चुकीची माहिती मिश्रा यांनी दिली आहे. रमण हा एक पत्रकार होता आणि त्या दिवशी शेतकऱ्यांच्या निषेध मोर्चाचं वार्तांकन करत होता. वार्तांकन करतानाच तो बेपत्ता झाला आणि नंतर त्याचा मृतदेह सापडला.
शेतकऱ्यांवर ज्यावेळी गाडी घालण्यात आली, तेव्हा तो संयुक्त किसान मोर्चाचे नेते ताजिंदर सिंग विर्क यांची मुलाखत चित्रीत करत होता. गाडी शेतकऱ्यांच्या दिशेने येताना दिसताच त्याने त्या दिशेने कॅमेरा वळवला. त्या फुटेजमध्ये गोळीबार झालेलाही चित्रीत झाल्याचा आरोप रामआश्रय कश्यप यांनी केला आहे.
रमण याचा भाऊ पवन यानेही या घटनेला दुजोरा दिला आहे. जेव्हा शवागारात रमणचा मृतदेह पाहिला तेव्हा त्याच्या अंगावर जखमा होत्या. त्याच्या खांद्याला मार लागल्याचं दिसत होतं आणि डोक्याला जखमा झाल्याचं दिसलं होतं. रमणच्या छातीवर आणि उजव्या हातावर गोळी लागल्याच्याही खुणा होत्या, असं कश्यप कुटुंबाचं म्हणणं आहे.





























































