विसर्जनाचा वाद विनाकारण, लालबागचा राजा मंडळ हिरालाल वाडकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार

समुद्राला मोठी भरती असल्याने ‘लालबागचा राजा’चे विसर्जन रविवारी विलंबाने झाले. मात्र विसर्जनाबाबत हिरालाल वाडकर यांनी खोटी माहिती पसरवून बदनामी केली. त्यामुळे वाडकर यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय मंडळाने आज घेतला. उद्या हा दावा दाखल केला जाणार आहे.

लालबागचा राजाच्या विसर्जनाबाबत सोशल मीडियात विनाकारण वावड्या उठवण्यात आल्या. त्यासाठी हिरालाल वाडकर यांच्या दाव्याचा आधार घेण्यात आला. ‘आम्ही वाडकर बंधू अनेक वर्षांपासून लालबागचा राजाचे विसर्जन करत आलो आहोत. यंदा मात्र मंडळाने गुजरातच्या तराफ्याला कंत्राट दिले आणि गणित चुकले’, असे त्यांनी सांगितले. त्यांचे हे म्हणणे खोटे आहे. वाडकर यांचा लालबागचा राजा मंडळाशी काहीही संबंध नाही. कधीच त्यांनी राजाचे विसर्जन केलेले नाही. केवळ प्रसिद्धी आणि बदनामीच्या हेतूने त्यांनी हा व्हिडीओ प्रसिद्ध केला. त्याविरोधात मंडळाने हायकोर्टात अब्रूनुकसानीचा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली

तराफा ठाण्याच्या कंपनीने बनवला

‘लालबागचा राजा’च्या विसर्जनासाठी यंदा अत्याधुनिक तराफा दाखल झाला. हा तराफा गुजरातच्या कंपनीने बनवल्याच्या माहितीत तथ्य नाही. शॉफ्ट शिपयार्डने हा तराफा बनवला आहे. ही कंपनी ठाण्याची आहे. जुना तराफाही याच कंपनीने बनवला होता, असे मंडळाने स्पष्ट केले.