
जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या, नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचं अखेर 33 तासानंतर गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आलं. सांगता आरती करत शास्त्रोक्त पद्धतीने दरवर्षीप्रमाणे राजाचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी हजारो भाविकांनी गिरगाव चौपाटीवर उपस्थित राहत आपल्या लाडक्या राजाला निरोप दिला व पुढच्या वर्षी लवकर ये असेही सांगितले.
शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी बाराच्या सुमारास लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. तब्बल 20 तासांच्या मिरवणूकीनंतर, लाखो भक्तांना दर्शन देऊन लालगबाचा राजा सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. यंदा लागबाच्या राजासाठी नवा आधुनिक तराफा बनविण्यात आला होता. मात्र भरतीच्या वेळी लाटांच्या मारऱ्यामुळे लालबागच्या राजाला नवीन तराफावर हलविण्यात येण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे सकाळी आठ ते संध्याकाळी साडे सहा पर्यंत कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नानंतर राजाला तराफावर हलविण्यात सर्वांना यश आले. मात्र तोपर्यंत लालबागच्या राजाला अशाप्रकारे खोळंबलेलं पाहून भाविकांचं मन मात्र हेलावून गेलं. अनेक भाविक गिरगाव चौपाटीवर उपस्थित राहून आपल्या राजाला सोबत करत होते.
अखेर आठ वाजता लालबागचा राजा विसर्जनासाठी रवाना व्हायला सज्ज झालात त्या आधी भक्तांनी समुद्र किनारी त्याची मनोभावे सांगता आरती केली. त्यानंतर फुलांना सजवलेला तराफा लालबागच्या राजाला घेऊन खोल समुद्राकडे जायला निघाला. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते देखील या तराफावर होते.