
लालबाग येथील इब्राहिम कासम चाळ मंगळवारी रात्री एका भयंकर प्रकाराने हादरली. या चाळीत राहणाऱया एका 54 वर्षीय महिलेचा मृतदेह घरातील कपाट आणि स्टीलच्या टाकीत तुकडे करून लपवलेल्या अवस्थेत सडलेला मृतदेह सापडला. गंभीर म्हणजे, त्या महिलेच्या मुलीनेच जन्मदात्या मातेचे तुकडे करून तिला घरातच लपवले होते. गेली तीन महिने ती आईच्या मृतदेहासोबत एकाच घरात होती. अखेर हा प्रकार समोर आला आणि ती गजाआड झाली.
वीणा प्रकाश जैन ही महिला तिची मुलगी रिंपल (24) हिच्यासोबत इब्राहिम कासम चाळीत पहिल्या मजल्यावर राहत होती. वीणा यांचे भाऊ प्रत्येक महिन्याला त्यांना पैसे देत होते. मंगळवारी सायंकाळी वीणा यांच्या एका भावाची मुलगी पैसे देण्यासाठी घरी गेली असता वीणा या गेल्या तीन महिन्यांपासून दिसल्या नसल्याचे तेथील शेजाऱयांनी त्या तरुणीला सांगितले. त्यामुळे तिने तिची आई व काकूला ही बाब सांगून इब्राहिम कासम चाळीत बोलावून घेतले. मात्र आई कानपूरला गेली असून तिच्याशी काहीच संपर्क नसल्याचे सांगून रिंपल तिघींना घरात घेण्यास मज्जाव करीत होती. त्यामुळे पैसे देण्यासाठी आलेल्या तरुणीने तिच्या चुलत भावाला तेथे बोलावून घेतले. त्याप्रमाणे तिचा भाऊ तेथे गेला व तो घराचा दरवाजा ढकलून आत घुसला. तेव्हा घरातले वातावरण फारच गलिच्छ होते व तेथे त्याची आत्या वीणा नव्हती. त्यामुळे त्या सर्वांनी मिळून लगेच काळाचौकी पोलीस ठाणे गाठले. वीणाचे भाऊ सुरेशकुमार पोरवाल (60) यांनी वीणा या बेपत्ता असल्याची तक्रार काळाचौकी पोलिसात दिली व वीणा गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे सांगितले.
पायाखालची जमीनच सरकली
काळाचौकी पोलिसांचे एक पथक लगेच इब्राहिम कासम चाळीच्या दिशेने रवाना झाले. घरात शिरताच दुर्गंधी येऊ लागल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा घरातील एका लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडताच सगळे हबकले. कारण त्या कपाटातील खालच्या रकान्यात प्लॅस्टिकच्या गोणीत लपवून ठेवलेला वीणा यांचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. शिवाय बाजूलाच असलेल्या एका स्टीलच्या टाकीत वीणा यांचे तोडलेले दोन्ही हात व पाय मिळून आले. याबाबत विचारले असता, ते मीच केले असल्याची कबुली रिंपलने पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून रिंपलला अटक केली. शिवाय घरात चाकू, कोयता आणि मार्बल कटिंगची मशीन हस्तगत केली.
हत्येचे गूढ गुलदस्त्यात
वीणा यांची हत्या नेमकी कशी झाली, त्यांना कशाप्रकारे मारण्यात आले हे अद्याप समजू शकलेले नाही. कोयता, मार्बल कटिंग मशीन घरात कोणी आणि कधी आणले हे प्रश्न मात्र अनुत्तरीत असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

























































