चारा घोटाळय़ात लालूंना जामीन; 66 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
lalu prasad yadav

चारा घोटाळय़ातील डोरंडा कोषागार प्रकरणात राजदचे नेते, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना शुक्रवारी झारखंड उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंग यांनी लालूंना दिवाणी न्यायालयात 10 लाख रुपये जमा करण्याचा आदेश देत त्यांचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा केला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सीबीआयला मोठा झटका बसला.

डोरंडा कोषागार घोटाळ्यात विशेष सीबीआय न्यायालयाने 15 फेब्रुवारीला लालूंना दोषी ठरवून 5 वर्षांचा सश्रम कारावास आणि 60 लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली. त्यामुळे लालूंची पुन्हा तुरुंगात रवानगी झाली. त्यानंतर 66 दिवसांनी त्यांना जामीन मंजूर झाला आहे. लालूंनी शिक्षेच्या निम्म्या अवधीपेक्षा जास्त 41 महिन्यांचा तुरुंगवास भोगला आहे. याकडे लालूंच्या वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आणि जामिनासाठी विनंती केली. त्यावर सीबीआयने आक्षेप घेतला. मात्र सीबीआयचा युक्तिवाद फेटाळून लावत न्यायमूर्ती सिंग यांनी लालूंना सशर्त जामीन मंजूर केला. लालूंना याआधी चारा घोटाळ्यातील अन्य चार प्रकरणांत जामीन मिळाला आहे.

10 लाख जमा करा, देशाबाहेर जाऊ नका!

झारखंड उच्च न्यायालयाने लालूंना शुक्रवारी जामीन मंजूर करताना तीन अटी घातल्या. सीबीआय न्यायालयाने ठोठावलेल्या 60 लाखांच्या दंडापैकी 10 लाख रुपयांची रक्कम दिवाणी न्यायालयात जमा करा, न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय देशाबाहेर जाऊ नका, तसेच मोबाईल नंबर आणि राहण्याचे ठिकाण बदलू नका, असे निर्देश न्यायालयाने लालूंना दिले.