
नवीन नागपूर आणि नवीन बाह्यवळण रस्ता प्रकल्पासाठी आवश्यक अशी खासगी जमीन वाटाघाटीने थेट खरेदीद्वारे संपादीत करताना या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ करण्यास आज मान्यता देण्यात आली.
नागपूर जिह्यातील हिंगणा येथील मौजे गोदणी आणि मौजा लाडगाव येथे नवीन नागपूर अंतर्गत इंटरनॅशनल बिझनेस अँड फायनान्स सेंटर विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची उभारणी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे. याचबरोबर नागपूर शहराभोवती 148 किलोमीटरचा बाह्यवळण रस्ता आणि त्यालगत चार वाहतूक बेट (टर्मिनल्स) विकसित करण्यात येणार आहेत.
या दोन्ही प्रकल्पांसाठी खासगी जमीन वाटाघाटीने खरेदी करावी लागणार आहे. त्यासाठी सुमारे 637 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. हे दोन्ही प्रकल्प महत्त्वाकांक्षी आणि सार्वजनिक हिताचे आहेत. यातून परिसराच्या विकासाला मोठी गती लाभणार आहे. अनेक उद्योग, व्यवसायांना संधी लाभणार आहे. त्याकरिता हे दोन्ही प्रकल्प वेळेत पूर्ण करावे लागणार आहेत. त्यासाठी मुद्रांक आणि नोंदणी शुल्क माफ केल्यास प्रकल्पाला आणखी गती मिळणार असल्याने हे शुल्क माफ करावे, अशी मागणी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शासनाकडे केली होती.
























































