
सामना ऑनलाईन । महाड
मुसळधार पावसात सुरू असलेले अपघातांचे सत्र अजूनही थांबता थांबेना. अंधेरीचा पूल कोसळून मुंबईकरांची दैना उडाली असतानाच आज सकाळपासून मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा लोचा झाला. महाडजवळील केंबुर्ली येथे भलीमोठी दरड कोसळल्याने महामार्ग सहा तास ठप्प होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र भरपावसात हजारो प्रवाशांचे अतोनात हाल झाले. वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाड परिसरातील डोंगराची माती अतिशय भुसभुशीत झाली आहे. आज सकाळी सहाच्या सुमारास दगडमातीचे ढिगारे केंबुर्ली गावाजवळ असलेल्या महामार्गावर कोसळले. घटनास्थळी चिखल तसेच दगडांचा खच पडल्याने महामार्गावरील वाहतूक थांबली. आपत्कालीन यंत्रणेने धाव घेऊन जेसीबी तसेच अन्य सामग्रीच्या मदतीने दरड हटविण्याचे मदतकार्य सुरू केले. सकाळी ११ च्या सुमारास हे काम पूर्ण झाले. तोपर्यंत प्रवाशांची चांगलीच रखडपट्टी झाली. अजूनही तेथे मोठय़ा प्रमाणावर चिखल साचल्याने पुन्हा दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वीरपासून कशेडीपर्यंत दासगाव, केंबुर्ली, नडगाव या ठिकाणी धोका कायम आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱया प्रवाशांनी संथ गतीने वाहने चालवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
दहा मिनिटे आधीच शिवशाही बस गेली होती
केंबुर्ली गावाच्या हद्दीत सकाळी ६ वाजता दरड कोसळली. मात्र या घटनेपूर्वी फक्त दहा मिनिटे आधीच जळगावच्या दिशेने शिवशाही बस गेली होती. महाड डेपोतून ही बस रोज सकाळी पावणे सहाच्या सुमारास सुटते. स्वारगेटमार्गे जळगावला जाणाऱ्या या बसमध्ये प्रवासी मोठय़ा संख्येने होते. केवळ दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी बचावले. ही बस निघून गेल्यानंतर दहा मिनिटांनी मोठा आवाज येत दरड कोसळली.
… आणि श्वास रोखला गेला
एका बाजूला भलामोठा डोंगर आणि खाली दुथडी भरून वाहणारी सावित्रीनदी या दोघांमधून मुंबई-गोवा महामार्ग जातो. आज सकाळी दरड कोसळल्यानंतर मोठय़ा प्रमाणावर दगड-मातीचे ढिगारे कोसळले. आपत्कालीन यंत्रणेचे कर्मचारी ढिगारा उपसण्याचे काम करत होते तेव्हा ढिगाऱयाच्या खाली एखादे वाहन अडकले असावे या भीतीने सर्वांचा श्वास रोखला गेला. मात्र सुदैवाने कोणतेही वाहन अडकले नव्हते. २००५ च्या अतिवृष्टीत दासगाव, जुई, कोंडीवते, रोहन या गावांवर दरड कोसळून मनुष्यहानी झाली होती. यंदाच्या पावसाळ्यातदेखील ४० गावांना दरडी कोसळण्याचा धोका असल्याने सावधगिरीचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
























































