रत्नागिरीत मुसळधार पाऊस, आंबा घाटात कोसळली दरड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यात आज मुसळ्धार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. आंबा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर युध्दपातळीवर काम करत दरड बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरू झाली आहे. तसेच नदीत पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 130.99  मिमी तर एकूण 1178.90 मिमी पावसाची नोंद झाली आहे.  दापोली तालुक्यात मौजे दाभोळ येतील काशिनाथ जोशी यांच्या घराशेजारी दरड कोसळल्याने घराचे अंशत: 22 हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी  झालेली नाही.

संगमेश्वर तालुक्यात मौजे धामापुर येथे काल दुपारी तीन वाजता दरम्यान शैलेश दत्ताराम चव्हाण, वय वर्षे 33 व चेतन सुरेश सागवेकर वय वर्षे 18 हे नदीवर पोहायला गेले असता नदीत बुडून त्यांचा मृत्यू झाला.

रत्नागिरी तालुक्यात मौजे गोळप येथे जमीन खचल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून तीन कुटुंबे सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहेत. राजापूर तालुक्यात मौजे नाटे येथील ठाकरेवाडी जवळील साकव पाण्याखाली गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.