‘सूर्या’ची जलवाहिनी टाकत असताना भूस्खलन; पोकलेनसह चालक गाडला गेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सूर्या प्रकल्पातील पाणी पाइपलाइनने मीरा, भाईंदरला आणण्याचे काम सुरू आहे. वर्सोवा पुलाजवळ जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना अचानक भूस्खलन झाले आणि 50 फूट जमिनीखाली पोकलेन, कंटेनर गाडले गेले. यामध्ये चालकही अडकला आहे. बुधवारी रात्री आठ वाजता ही दुर्घटना घडली. मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ यांच्यासह सर्व आपतकालीन टीम शोधकार्यात झोकून देऊन काम करत आहे. मात्र 24 तास उलटले तरी ढिगारा उपसण्याचे काम सुरूच असून ड्रायव्हर रिकेश यादव (38) चा अजूनही शोध लागलेला नाही.

सूर्या प्रकल्पाचे पाणी वर्सोवा खाडीमार्गे मीरा, भाईंदर शहराला आणण्याचे काम सुरू आहे. बुधवारी वसई खाडी पुलाखालून पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू होते. रात्री आठच्या सुमारास पायलिंग खांब खचले आणि 50 फूट खोल खोदलेल्या खड्ड्यात मातीच्या ढिगाऱ्यासह एक पोकलेन आणि कंटेनर आत कोसळला. पोकलेनवर काम करत असलेला चालक रिकेशही ढिगाऱ्याखाली अडकला. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके घटनास्थळी दाखल झाली. खाडीकिनारा असल्यामुळे पाण्याचा दबाव जास्त आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. जमिनीखाली अडकलेल्या कामगाराला सुखरूप बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मात्र 24 तास उलटले तरी अजूनही रिकेशचा शोध लागलेला नाही.

कंपनीचा निष्काळजीपणा

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याने या वाहतूककोंडीचा फटका रेस्क्यू ऑपरेशनला बसला आहे, मोठ्या यंत्रसामग्री या ठिकाणी आणण्यास त्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. पाइपलाइन टनेलचे काम करीत असताना काम करणाऱ्या एल अॅण्ड टी कंपनीकडून निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला जात आहे. या टनेलचे काम करत असताना पक्के लोखंडी बीम टाकण्याऐवजी आरसीसी केल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.