
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी अमेठीत शक्तीप्रदर्शन करत त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. या रॅलीच्यावेळी राहुल गांधी यांच्या डोक्याजवळ सतत लेझर लाईट मारण्यात येत होता. लेझर लाईट कदाचित स्नायपर गनचा देखील असू शकतो त्यामुळे राहुल गांधींच्या हत्येचा कट रचला जात असल्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांनी याबाबत गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहले असून याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच राहुल गांधींना योग्य सुरक्षा पुरवा अशी मागणी देखील या पत्रातून करण्यात आली आहे.
राहुल गांधी यांनी बुधवारी ट्रकमधून अमेठीत मोठी रॅली काढत नंतर उमेदवारी अर्ज भरला. या रॅलीत राहुलची बहीण प्रियंका गांधी वडेरा व तिची दोन मुलं देखील सहभागी झाली होती. या रॅलीत जवळपास सात वेळा राहुल गांधीच्या कपाळावर लेझर लाईट मारण्यात आल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. तसेच पत्रकारांशी संवाद साधताना आणि मंदिरात दर्शनासाठी गेले असताना देखील त्यांच्यावर लेझर लाईट मारण्यात आला. या प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, जयराम रमेश व रणदीप सिंग सुरजेवाला यांनी राजनाथ सिंह यांना पत्र लिहले आहे. तसेच त्या घटनेची व्हिडीओ क्लिप देखील त्यांना दिली आहे.
‘राहुल गांधींसोबत घडलेल्या प्रकाराने आम्हाला सर्वांना धक्का बसला आहे. हा त्यांच्या हत्येचा देखील कट असू शकतो. लेझर लाईट कदाचित एखाद्या स्नायपर गनची देखील असू शकते. या निवडणुकीच्या काळात राहुल गांधींच्या जीवाला सर्वात जास्त धोका आहे. त्यामुळे या प्रकरणाची सरकारने योग्य प्रकारे चौकशी करावी व राहुल गांधींना त्यांच्या पदाप्रमाणे चोख सुरक्षा पुरवावी’, असे काँग्रेस नेत्यांनी राजनाथ सिंहांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.


























































