‘यॉर्करकिंग’ लसिथ मलिंगा क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त

श्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मलिंगाने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यातून आधीच निवृत्ती घेतली होती. आता त्याने टी -20 मधूनही निवृत्ती घेतली आहे.

मलिंगाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एका संदेशाद्वारे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्याने टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतलेल्या विकेट्स दिसत आहेत. त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘खेळावरील माझे प्रेम कधीही कमी होणार नाही.’

तो म्हणाला आहे की, ‘मी गेल्या 17 वर्षांमध्ये मिळवलेल्या अनुभवाची मैदानावर यापुढे गरज नाही. कारण मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या खेळात आपलं नाव कमावण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या तरुण पिढीला माझा नेहमीच पाठिंबा असून मी त्यांना मार्गदर्शन करत राहीन. ज्यांना या खेळाची आवड आहे त्यांच्यासोबत मी नेहमीच असेल.’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच वेळा हॅटट्रिक घेणारा मलिंगा टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये 107 विकेट्स घेतल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या