
या वर्षातील हे अखेरचे चंद्रग्रहण उद्या, मंगळवारी कार्तिक पौर्णिमेला होणार आहे. महाराष्ट्रातून खंडग्रास स्थितीत चंद्र उगवताना दिसणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. हे चंद्रग्रहण संपूर्ण आशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलियातून दिसणार आहे. साध्या डोळ्यांनी चंद्रग्रहणाचे दृश्य पाहता येईल. यानंतर हिंदुस्थानातून दिसणारे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर 2023 रोजी होणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले.
चंद्रग्रहणास प्रारंभ दुपारी 2.39 मिनिटांनी होईल. दुपारी 3.47 ते 5.12 संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थिती होईल. सायंकाळी 6.19 वाजता चंद्रग्रहण सुटेल. जेथे दृश्य आकाशात चंद्रबिंब असेल तेथे चंद्रग्रहण दिसेल. हिंदुस्थानच्या पूर्व भागात खग्रास स्थितीतच चंद्र उगवताना दिसणार आहे. कोलकाता येथे खग्रास स्थितीमध्येच सायंकाळी 4.52 वाजता ‘ब्लड मून’ चंद्र उगवताना दिसेल. छायाचित्रकारांना ती एक पर्वणी असेल.
मुंबईतून पाहिल्यास सायंकाळी 6 वाजून 1 मिनिटांनी खंडग्रास स्थितीतच चंद्र उगवेल. पुण्यात सायंकाळी 5.57, नाशिकला सायंकाळी 5.55, संभाजीनगरला सायंकाळी 5.50, नागपूरला सायंकाळी 5.32 आणि कोल्हापूरला सायंकाळी 5.58 वाजता खंडग्रास ग्रहणातच चंद्र उगवताना दिसेल. सायंकाळी 6.19 वाजता चंद्रग्रहण सुटेल.



























































