आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी मिळाली! लतादीदींनी पाठविलेल्या भेटवस्तूमुळे समीर चौघुले झाला भावुक 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या माध्यमातून प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसविणारा अभिनेता समीर चौघुले सोमवारी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. साक्षात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडून त्याला कामाची पावती मिळाली. लतादीदींनी समीरला भेटवस्तू पाठवून त्याचे कौतुक केले आहे. ‘‘आज मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी मिळाली,’’ अशी भावना समीरने व्यक्त केली आहे.

   सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत समीरने म्हटलेय, ‘‘निसर्ग किती ग्रेट आहे ना! शब्द संपले की, भावनांना वाट मिळावी म्हणून त्याने अश्रूंची निर्मिती केली. आज ते प्रकर्षाने जाणवले. आज सुरांची आणि स्वरांची सरस्वती आदरणीय लतादीदींनी अत्यंत प्रेमाने घरी एक भेटवस्तू आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी पाठवली. ती ट्रॉफी म्हणजे दीदींच्या हस्ताक्षरातील शुभेच्छा आणि आशीर्वाद. थिजून जाणं म्हणजे काय ते आज मला कळलं.’’

   पुढे तो म्हणला, लतादीदी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नेहमी बघतात आणि खूप हसतात, एन्जॉय करतात ही आम्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कुटुंबीयांसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. हा सुवर्णक्षण आयुष्यात आला तो फक्त आणि फक्त आमच्या ‘हास्यजत्रा’ कुटुंबामुळे असे म्हणत त्याने संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. या पोस्टसोबत समीरने लतादीदींनी पाठविलेल्या शुभेच्छा पत्राचा फोटो शेअर केला आहे. ‘‘लेखक, डायरेक्शन आणि सुंदर अभिनय! देवाची पूर्ण कृपा यालाच म्हणतात. माझ्या अनेक शुभेच्छा!’’ असा संदेश लतादीदींनी त्यावर लिहिलेला दिसतोय. गेल्याच महिन्यात लतादीदींनी फोनवरून समीर चौघुले आणि विशाखा सुभेदारचे कौतुक केले होते.