
लतादीदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या आधारच होत्या, सगळ्या सुख दुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दिदींच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठा आघात झाला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
बाळासाहेब असताना आणि नंतर देखील लतादीदी ठाकरे परिवाराचा एक अविभाज्य भाग होत्या. प्रसंग कुठलाही असो, दीदींचा फोन नेहमी असायचा. त्यांनी अनेक प्रसंगात आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सतत पाठीशी उभ्या राहणाऱ्या दीदी आज आपल्यात नाहीत, माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांमध्ये रश्मी ठाकरे यांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.






























































