सरस्वतीची इबादत आणि भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दीदींच्या 90 वर्षांच्या आयुष्यात संपर्कात आलेल्या व्यक्ती त्यांच्या कुटुंबाचा भाग बनून गेली. त्यांच्या पुढील पिढीवरसुद्धा दीदींची माया कायम आहे… राम शेवाळकर, सुरेश भट, कवी ग्रेस या विदर्भात वास्तव्यास असलेल्या प्रतिभावंतांना व त्यांच्या कुटुंबियास लतादीदींना जवळून अनुभवण्याचे भाग्य प्राप्त झाले. त्यातील राम शेवाळकरांचे सुपुत्र आशुतोष यांच्या आठवणीतील लतादीदींची ‘भेट’…

2004 सालचा प्रसंग. चतुरंगचा पुरस्कार वितरण सोहळा पणजी येथे आयोजित केला होता. या सोहळ्याची अनेक वैशिष्टय़े होती. परंतु लतादीदी आणि तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्यातील हृदयस्पर्शी सोहळा अधिक संस्मरणीय ठरला. लतादीदींचा चतुरंगच्या सोहळ्यात सत्कार ठरला होता. प्रेक्षकात स्वयं सत्कारमूर्ती लतादीदींची उपस्थिती. त्यामुळे उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबलावादनाने सोहळ्याची रंगत अजूनच वाढली होती. लतादीदींनी उस्ताद झाकीर हुसेन यांना भरभरून दाद दिली. संगीत क्षेत्रातील सरस्वतीची दाद मिळाल्याने उस्ताद झाकीर हुसेन भारावून गेले. आपले वादन संपताच त्यांनी सरळ व्यासपीठावरून उडी घेतली ती पहिल्या रांगेत बसलेल्या लतादीदीं समोर. लतादीदींच्या पायावर डोक ठेवून झाकीर हुसेन नतमस्तक झाले. लतादीदींनी झाकीर हुसेन यांना शुभाशीर्वाद दिले. दीदींनी आपल्या बोटातील हिऱ्याची अंगठी काढून झाकीर हुसेन यांच्या हातावर ठेवली. जणू सरस्वतीने संगीत उपासनेतील रत्नाला हिऱ्याने नवाजले. उस्ताद झाकीर हुसेन आपल्या गुडघ्यांवर बसले. खिशातून रुमाल काढून आपल्या हाताने लतादीदींच्या पायातील पादत्राणे काढली. आपल्या रुमालाने झाकीर हुसेन यांनी लतादीदींचे पाय पुसले. त्याच रुमालाने झाकीर हुसेन यांनी आपले कपाळ घासून घेतले. लतादीदींच्या पायाची धूळ आपल्या मस्तकी लावून झाकीर हुसेन यांनी केलेली सरस्वतीची इबादत हाच कलावंताच्या धर्माची प्रचीती देतो. दोन महान प्रतिभावंतांच्या ह्या अद्भुत सोहळ्याचा मागे बसून साक्षीदार होण्यासारखं दुसर भाग्य नाही. लतादीदींच्या सत्कार सोहळ्यात पुरस्कृत झाकीर हुसेन झाले व माझ्यासारखे उपस्थित अनेक रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

दीदींचा शेवाळकर कुटुंबीयांवरील स्नेह शब्दांत वर्णन करता येणे शक्य नाही. दीदींचे दर्शन व्हावे अशी कुटुंबाची अनेक दिवसांची इच्छा. लतादीदींनी वयोमानाप्रमाणे गेल्या काही वर्षांत स्वतःचा सार्वजनिक सहभाग मर्यादित ठेवला आहे. गेल्या वर्षी 24 डिसेंबरला आम्हा कुटुंबियांची भेटण्याची इच्छा मात्र दीदींनी पूर्णत्वास नेली. सोबत मुलं येणार म्हणून लतादीदींनी खेळणी अगोदर बोलावून ठेवली होती. लतादीदींच्या दिवाणखाण्यात अर्धा पाऊण तास लतादीदींसमवेत चर्चा झाली. दीदींनी कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. निरोप घेताना लतादीदींनी स्वतःजवळील श्री सिध्दिविनायकाची चांदीची मूर्ती मुलांना आशीर्वाद म्हणून दिली. वडीलधाऱया लतादीदींच्या आशीर्वाद स्वरूपात प्राप्त झालेल्या या अविस्मरणीय भेटी अनमोल आहेत.

शब्दांकन – प्रतीक राजूरकर