
सोमवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास बोलेरो टेम्पोने औसा येथील राष्ट्रीय महामार्गावरील औसा ते तुळजापूर रोड वरील नवीन रस्ता दुभाजकावर घुसून पावर हाऊस जवळ असलेल्या पुलास धडक दिली. या अपघातात शोभाबाई विभिषण रणदिवे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बोलेरो टेम्पोतील इतर 25 जण जखमी झाल्याची घटना घडल्याने औसा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रोजी सकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान कोल्हापूरहून ऊसतोड कामगार हे लातूर तालुक्यातील वासनगाव येथे एका अंत्यविधीसाठी येत असताना चालकाला झोपीची डुलकी आल्याने आपल्या ताब्यातील वाहन बोलेरो टेम्पो हे औसा जवळील पावर हाऊस जवळच्या नवीन राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता दुभाजकावर घुसून पुलास धडक दिल्याने गाडीचा अक्षरशः चुराडा झाला व तुकडे विखुरलेले दिसले. चालक अमोल राजाराम नंदिवाले यांच्यासह इतर २५ जण जखमी झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालय लातूर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास औसा पोलीस करीत आहेत.


































































