
लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील मौजे वडवळ नागनाथ येथील संजीवनी टेकडी दुर्मिळ औषधीसाठी प्रसिद्ध आहे. शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या टेकडीवरील दुर्मिळ वनौषधी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. टेकडीच्या संवर्धनासाठी केवळ समित्यांचे अहवाल घेऊन तो दप्तर बंद ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष संवर्धन आणि संगोपन यासाठी पुढाकार घेण्यात आला नाही तर इतिहासामध्ये इथे दुर्मिळ वनौषधी वनस्पती होत्या असे वाचण्याची वेळ लातूर जिल्हावासियांवर येणार आहे. या टेकडीवर वनौषधी वाढवणे, संगोपन आणि संवर्धनासोबतच संशोधनासाठी विशेष काम करण्याची आवश्यकता आहे.
चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथची संजीवनी बेट यामुळे सर्वत्र वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. या टेकडीवर दुर्मिळ औषधींचा खजिना आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून दरवर्षी सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या उत्तर नक्षत्रामध्ये या टेकडीवर विविध आजाराने ग्रस्त असणारे रुग्ण, वैद्य यांची जत्राच भरलेली असते. याठिकाणी येणाऱ्यांमध्ये केवळ मोजक्या लोकांनाच वनस्पतींची ओळख असते. इतर मात्र दिसेल तो झाडपाला काढून खात असतात त्यामुळे टेकडीवरील दुर्मिळ वनौषधी नामशेष होत आहेत.
संजीवनी टेकडीचे जवळपास 35 हेक्टर क्षेत्र आहे. अतिशय दुर्मिळ वनौषधी याठिकाणी आहेत. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या वतीने सन 2000 मध्ये या टेकडीवर अभ्यासासाठी एक समिती पाठवण्यात आली होती. या समितीने काही उपाययोजनाही सुचविल्या होत्या परंतु त्या सर्व दप्तर बंद झालेले आहेत. याठिकाणी पूर्ण वेळ कार्यालय आणि कर्मचारी नियुक्त करून टेकडीवरील वनौषधीचे संगोपन आणि संवर्धनाकडे लक्ष द्यावे, वनौषधींची नर्सरी सुरू करण्यात यावी. त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या बेरोजगार युवकांना काम मिळेल त्यासाठी सर्व तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे असे सुचवण्यात आले होते. परंतु यासंदर्भात काहीही काम झालेले नाही.
संजीवनी टेकडीवर आजूबाजूच्या परिसरापेक्षा आणि जास्त प्रमाणात वनस्पतीचे वैविध्य असल्यामुळे या टेकडीवर अनेक फुलपाखरांचे होस्ट प्लांट म्हणजेच ज्या वनस्पतीवर फुलपाखरे अंडी घालतात आणि त्या वनस्पती तसंच त्यांच्या सुरवंटाचे खाद्य आहेत, अशा वनस्पती येथे आहेत. यामुळेच येथे नैसर्गिकरित्या 35 पेक्षा जास्त प्रजातीची फुलपाखरे विपुल प्रमाणात आढळतात.
संजीवनी टेकडीवर उपलब्ध असलेल्या दुर्मिळ औषधी मध्ये – गूडमार, उंदीरकानी, वासनवेल, गुळवेल, पिवळा धोत्रा, गुंज (पांढरा, लाल बिया), रानलवंग, बहावा, रान मिर्ची, करटुली, रानतुळस, कारंज, रुई, अनंतमुल, वाघाटी, रान जाई, निर्गंडी, अघाडा, चंदन, शिवण, भुस्त्रान, काटक, केना, श्वेतसारिवा, सलपर्णी, टाकली, बाला भेड, रोहित तरना, लोखांडी, मदनफळ, दुर्वा, तुळस, रक्त पुर्ननावा, पुर्ननावा श्वेता, गोकशूर, शंखपुष्पी,, नाय, विष्णूकांता, अवर्तनी, अडुळसा, अश्वगंधा, शतावरी, ब्राम्ही, कार, तरवड, भारंगी, कर्र, तरवड, शिवलिंगी, मका, भुईम्बर, हेकल, छित्रक, रक्तरोहिडा, गुडमार, वंजारी, अरानी, रोषा घास, काळे तिळ, निम, घनेरी, कुर्डू, अघाडा, रामवड, अतिबला, खैर, खदीरवल्ली, बेल, कृष्ण शिरीष, काळा शिरीष, सफेद शिरीष, कालमेघ, धावडा, दंती, आपटा, काळे तिळ / रानतिळ, मारली मातंग, काटेसावर, चारोळी, पळस, पाच पानाचा पळस, काळी टाकळा (हबब), सागरगोटे, गजगा, चिलार, कारबोर / किरमा, पाचुंदा, बहावा (घेळा, गेळफळ, मदनफळ), मालकांगनी, गोकर्णी, पिलूकी, हळदवेल, महामूळ, भोकर, दहीपळस, वायवर्ण, पांढरा ताग, खुळखुळा, अमरवेल, सोमलता, फणशी, दांडूस, शिसम, काकजंघा, टेंभूर्णी, मेढशिंगी, बुच पांगारा, लाल पांगारा, करडकोसला, गुडमार (बेडकी), मुरडशेंग, खुरी, लोखंडी, बोंडारा, मेंहदी, कवठ, बारतोंडी, चित्रक, शमी, सौंदड, फांज भाजी, रिठा, बिब्बा, भिलावा, मांसरोहीनी, चिंच, अर्जुन, हेळा, बेहडा, गवळण, कवंडळ, मुरमाटी बाभुळ, काळा कुडा, पिंपळ, रामवड, सीताफळ, बोर, घाटबोर, अग्निशिखा, अनंतमूळ, भुत्याकेशी, काटेकोरंटी, रान कोरंटी, गोरांटी गोरांटी, लाजाळू, आसाना, तांबट, आठरूण, महारूख, हुंब, करंज, शिवण, ऐन, मोई, चनबोर, येरोणी यांचा समावेश आहे. नर्सरीच्या माध्यमातून इथे संवर्धन आणि संगोपनासोबतच संशोधन कार्यही होणे आवश्यक आहे. तातडीने टेकडीवरील झाडांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.
शासनाच्या वतीने ‘क’ वर्ग पर्यटन म्हणून नोंद आहे. बेट वनविभागाच्या ताब्यात आहे तर टेकडीच्या वरच्या भागाचा सातबारा वायरलेस विभागाच्या टॉवरसाठी चक्क नांदेड परिक्षेत्र पोलीस विभागाच्या नावे करण्यात आला आहे. टेकडीवरील संपूर्ण भागाचा सातबारा त्याच्याकडे आहे त्यामुळे औषधी बेट नेमके कोण आणि असे जपणार याकडे कोणाचेच लक्ष नाही. यावर जिल्हा प्रशासनाने आणि वन विभाग पर्यावरण समिती जिल्हा परिषद यांनी विचार विनीमय करून योग्य नियोजन केल्यास एवढा मोठा पारंपरिक वनऔषधी ठेवा जपला जाईल.
























































