लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 46500 जणांची तपासणी, 6324 कोरोना पॉझिटीव्ह आढळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत तब्बल 46500 जणांची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 6324 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. 4518 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी परतलेले आहेत तर तब्बल 220 जणांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा दरही देशातील आणि राज्यातील मृत्यूदरापेक्षा अधिकच आहे.

लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 20191 आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये 2962 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. तर रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट 26309 करण्यात आलेल्या असून त्यामध्ये 3362 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. सध्या रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्टची संख्या ही टेस्टकिट कमी असल्याकारणाने कमी होत आहे. जुलै महिण्यापासून वाढत जाणारा कोरोनाचा आलेख वाढतच चाललेला आहे. लातूरकरांसाठी चिंतेचा विषय म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण. देशात आणि राज्यात होणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूच्या दरापेक्षाही लातूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा दर अधिक असून तो कमी करता आलेला नाही. आजपर्यत तब्बल 220 रुग्णांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे.

लातूरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये सर्वाधिक 150 जणांचे मृत्यू झालेले आहेत. उदगीर येथील सामान्य रुग्णालयात 40 जणांचे मृत्यू झालेले आहेत. शहरातील अल्फा हॉस्पीटल या खाजगी रुग्णालयात 10 रुग्णांचे मृत्यू झालेले आहेत. फुलाबाई बनसोडे हॉस्पीटल येथे 5 जणांचे, उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे 3, विवेकानंद हॉस्पीटल लातूर व लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल येथे प्रत्येकी 2, आदित्य बिर्ला हॉस्पीटल पिंपरी चिंचवड, मुलांची शासकीय शाळा औसा, शासकीय वसतीगृह इमारत देवणी, कृषी पी.जी.कॉलेज चाकूर , कमलनयन बजाज हॉस्पीटल संभाजीनगर, निर्मल हॉस्पीटल नांदेड, यशोधरा हॉस्पीटल सोलापूर व जिल्हा रुग्णालय नांदेड येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.
70 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या रुग्णांचे मृत्यू सर्वाधिक म्हणजे 88 एवढे आहेत. 60 वर्षावरील व्यक्तींचे मृत्यू 68 आहेत , 50 वर्षावरील व्यक्तींचे मृत्यू 36 आहेत तर 50 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींचे मृत्यू 28 आहेत. लातूरकरांसाठी समाधानाची बाब म्हणजे आजपर्यंत तब्बल 4518 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेलेले आहेत. लातूर जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर आता 71.44 टक्के झालेला आहे. 1586 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.