
सामना प्रतिनिधी। गुडसुर
मराठवाड्यात शासनाना मार्फत शेतकऱ्यांना शेततळे देण्याची योजना राबवली जात आहे. पण तालुका कृषी अधिकारी मंडळ, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी साहाय्यक यांच्याकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात नाहीये. त्यामुळे तालुक्यातील 27 शेततळ्याचे काम अपूर्ण राहीले आहेत. यामुळे या शेततळ्याची जवाबदार कोणाची ? असा प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी अडचणीत सापडला आहे.
मराठवाड्याला गेल्या तीन चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पावसानेच पाठ फिरवल्याने विहीरी, नदी व तळ्यांमधील पाण्याची पातळी खोल गेली आहे . यामुळे पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे . खरीप हंगामही पाण्याच्या अभावाने कोरडा जात आहे. रब्बी पेरणीचा तर विचार न केलेला बरा. जनावरांना चारा उपलब्ध होत नाही. अशा परिस्थिती मध्ये शेतकरी अडकला आहे.
उदगीर तालुक्यात जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत .त्यामुळे अल्प प्रमाणातही पाऊस झाला तरी पाणी साठले जात होते.त्याच बरोबर शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना शेततळे देण्यात आली. त्यामुळे शेतामध्ये भरपूर पाणी साठवून शेतकरी समाधानकारक उत्पन्न घेऊ शकेल. शेतकऱ्यांच्या शेतीमाल उत्पादनात वाढ व्हावी त्यांचे आर्थिक उत्पन्न चांगले व्हावे या साठी मागेल त्याला शेततळे कृषी विभागाच्या मार्फत देण्यात येत आहे. पण तालूका कृषी अधिकारी मंडळ, कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक व कृषी साहाय्यक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करत नाहीत. यामुळे तालुक्यातील 27 शेततळ्याचे काम अपूर्ण राहीले आहेत.
त्यातच कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना शेततळ्याचे महत्त्व सांगितले नाही. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. .20×15 मीटर आकारमानाचे शेततळे करण्यासाठी ऐकोत्तीस हजार रुपये.निधी मिळत असतो. या शेतळ्याच्या खोदकाम करण्यासाठी लागणारा खर्च खूप असुन मंजूर रक्कमेत हे काम पूर्ण होत नाही असे बोलले जात आहे. सन 2018 ते 19 या वर्षात केवळ 37 शेततळ्याचे काम पूर्ण झाले आहेत. त्यात प्रामुख्याने अवलकोंडा येथे 4 शेततळ्याचे काम पूर्ण झाली असून नांवदी 3,नळगीर 3, गुडसुर 1, तोगरी 1, उदगीर 1,जानापुर 2, तोंडचिर 1,मांजरी 1, तोंडार 1, मादलापुर 1, वायगाव 3, जकनाळ 2, शंभुउमरगा 1, तिवटग्याळ 1, नागलगाव 1, वाढवणा (खु) 1, मल्लापुर 1, येणकी 1, कोळखेड 1, कल्लुर 1, हणमंतवाडी 1, लोहारा 1, सताळा 1, बामणी 1,हैबतपुर आदी गावची कामे पुर्ण झाली आहेत तर 63 मंजुर पैकी 27 बाकी शेततळ्याचे कामे अपूर्ण आहेत.

































































