
लातूरच्या विद्यापीठाच्या उपकेंद्राचे रुपांतर स्वतंत्र विद्यापीठात करावे या मागणीसाठी ‘आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समिती’च्या वतीने येथील गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास चांगला पाठिंबा मिळाला.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र लातूर येथे 2007 मध्ये कार्यान्वित झाले. लातूर जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान, औषध निर्माणशास्त्र, विधी, अभियांत्रिकी, वैद्यकीय, अनुदानित विनाअनुदानित महाविद्यालयांची संख्या 150 असून 54 हजार विद्यार्थी संख्य आहे. प्रशासकीय कामाचे स्वरुप लक्षात घेता लातूर येथे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण होणे आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 109 महाविद्यालयांची संख्या असतानाही 2004 मध्ये शासनाने सोलापूरला स्वतंत्र विद्यापीठ निर्माण केले. लातूर येथे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करावे या मागणीसाठी आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने विविध आंदोलने करण्यात येत आहेत. या आंदोलनाचा भग म्हणून आज गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी लक्ष्मीरमण लाहोटी, रमेश बियाणी, माजी आमदार वैजनाथ शिंदे, व्यंकट बेद्रे, यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला.


































































