
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर जिल्ह्याचा पारा मागील कांही दिवसांपासून वाढत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत रस्त्यावरील वर्दळ कमी झालेली आहे. मध्येच खंडीत होणारा वीज पुरवठ्यामुळे नागरीक अधिक त्रस्त झालेले आहेत.
लातूर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. मे महिण्यात जाणवणारी उन्हाची तीव्रता एप्रिल अखेर जाणवत आहे. लातूरचा पारा 43 अंशावर गेलेला आहे. उन्हापासून होणारा त्रास टाळण्यासाठी सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत घराबाहेर पडणेही टाळले जात आहे. अगदीच महत्वाच्या कामासाठीच या वेळेत घराबाहेर मोजकेच लोक येत आहेत. त्यामुळे सतत वर्दळ असणारे रस्तेही सुनसान दिसत आहेत. लातूर जिल्ह्यात पाण्याची टंचाई उग्र स्वरुप धारण करीत आहे. मात्र प्रशासनने नागरिकांना वाऱ्यावर सोडून दिल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. वाढत्या उन्हामुळे त्वचा विकार वाढत आहेत. तसेच जुलाब, उलटी, मळमळ होण्याचे प्रमाणही वाढलेले आहे.

























































