दुर्देवी ! लातूरमध्ये लग्नासाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाळी खूर्द येथे एका लग्न समारंभासाठी आलेल्या तीन मुलांचा कोल्हापूरी बंधा-यात बुडाल्याने करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे. सकाळी एकीकडे लग्न समारंभाची जोरदार तयारी सुरू होती, तेलंगे परिवारात आनंदाचे वातावरण होते पण या दुर्दैवी घटनेमुळे एका क्षणात ते दु:खामध्ये रुपांतरीत झाले. या घटनेने सबंध जळकोट तालुका हादरला असून गावात शोककळा पसरली आहे.

लाळी खूर्द येथील तुळशीराम तेलंगे यांच्या मुलीचा विवाह सोहळा आज गावातच आयोजित करण्यात आला होता. घरी पाहुण्यांची मोठी गर्दी असल्याने बाहेरगावाहून आलेली मुलं आंघोळीसाठी कोल्हापूरी बंधाऱ्यावर गेली होती. दोन मुले पोहण्यासाठी बंधाऱ्यात उतरली. त्याचवेळी त्यांनी अन्य एका मुलास बंधाऱ्यात येण्यास सांगितले आणि येथेच घात झाला. त्या मुलाला पोहता येत नसल्याने तो बुडू लागला आणि त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात तिघांचाही बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला आहे.

एकनाथ हाणमंत तेलंगे (15) रा उदगीर, चिमा बंडू तेलंगे (15), बंडू तेलंगे (13) दोघेही रा. चिमेगाव ता. कमालनगर जि. बिदर या तीन अल्पवयीन व शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. मृत मुलांसोबत गेलेल्या मुलांनी गावात येऊन या दुर्दैवी घटनेची माहिती देताच गावकरी बंधाऱ्याकडे धावले.

आपत्ती व्यवस्थापन पथकास पाचारण करुन या बंधाऱ्यातून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर हे मृतदेह ग्रामीण रुग्णालय, जळकोट येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच उप विभागीय पोलीस अधिकारी बालाजी लंजिले , जळकोटचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, वाढोणा (बु. ) चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश मिटकरी हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील कार्यवाही केली. अचानक हे संकट ओढवल्याने लग्न समारंभावर शोकाचे सावट निर्माण झाले. यातील दोघे मयत हे सख्खे भाऊ आहेत. शोकाच्या सावटाखाली हा विवाह सोहळा पार पडला. या घटनेमुळे तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.