
>> सौरभ शर्मा
लॉकडाऊनच्या काळात थंडावलेली मुंबईतील लॉण्ड्री व्यावसायिकांची इस्त्रीच येत्या काळात आणखीन तापणार आहे. लॉकडाऊनमध्ये झालेले आर्थिक नुकसान आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्याच्या उपाययोजना लक्षात घेता मुंबईतील लॉण्ड्रीचालकांनी आपल्या इस्त्री आणि ड्रायक्लिनिंगच्या दरात वाढ करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. परिणामी 5 ते 6 रुपयांच्या घरात होणारी कपड्यांची कडक इस्त्री आता आणखी महागणार आहे. तर ड्राय क्लिनिंगचे दरदेखील येत्या 50 ते रुपये होणार असल्याची माहिती मुंबईतील अनेक लॉण्ड्री व्यावसायिकांनी दिली आहे.
कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे अनेक व्यावसायिकांना फटका बसला. यातून मुंबईतील लॉण्ड्री व्यावसायिकांचीदेखील सुटका झालेली नाही. मुंबईत लॉकडाऊन ओपन करताना अनेक ठिकाणी लॉण्ड्रीचालकांनी आपली दुकाने सुरू केली आहेत. तर अनेक ठिकाणी मात्र सरकारच्या परवानगीमुळे दुकाने सुरू करण्यासाठी हालचाली अद्याप सुरू आहेत. मात्र लॉकडाऊनच्या काळात झालेले नुकसान लक्षात घेता आणि येत्या काळात सुरक्षिततेचे उपाय योजना राबविण्याची गरज लक्षात घेता मुंबईतील लॉण्ड्री चालकांनी आपल्या दरात वाढ करण्याचा निणऱय घेतला आहे. यात प्रामुख्याने इस्त्री, वॉशिंग आणि ड्रायक्लिनिंगच्या दरात वाढ केली जाणार आहे. मुंबईतील लॉण्ड्रीचालकांचे दर हे असोसिएशनतर्फे निश्चित करण्यात आले असले तरी विभागानुसार दर हे वेगवेगळे आहेत. मात्र आपल्याला झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी आता जवळपास सर्वच लॉण्ड्रीचालकांनी इस्त्रीrच्या दरात एक ते दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबईतील कंटेनमेंट झोन लक्षात घेता अनेक ठिकाणी दुकाने बंद आहेत. पण दुकाने सुरु झाल्यानंतर ही दरवाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईतील अनेक दुकानदार आणि लॉण्ड्रीचालक हे इस्त्रीसाठी 5 ते 6 रुपयांचा दर आकारत होते. तर इतर ठिकाणी हे दर 7 ते 8 रुपये आहेत. मात्र आता हे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ज्या दुकानात इस्त्रीसाठी 5 ते 6 रुपये दर आकारले जात होते. ते आता 7 ते 8 रुपये इतका दर आकारण्यात येणार आहे. तर वॉशिंगसाठी 15 ते 20 रुपयांचा दर आकारण्यात येत होता. तो आता वाढवून 25 ते 50 रुपये इतके करण्यात येणार आहे.
दरनिश्चिती करणे आवश्यक
आज मुंबईत अनेक ठिकाणी लॉण्ड्री चालकांचे दर वेगवेगळे आहेत. असोसिशनच्या वतीने आम्ही या वर्षांच्या सुरुवातीलाच नवे दर लागू केले आहेत. त्यामुळे असोसिएशनच्या वतीने कोणतीही दरवाढ तूर्तास तरी करण्यात आलेली नाही. परंतु अनेक लॉण्ड्रीचालक ठरलेल्या दरानुसार पैसे न घेता कमी दर आकारत होते. ते दरवाढ करण्याच्या तयारीत असल्याची माहिती महाराष्ट्र लॉण्ड्रीमालक-चालक असोसिएशनचे अध्यक्ष शंकर रजक यांनी ‘दै. सामना’ला दिली.



























































