13 वर्षांनंतर वकिलाला आठवडाभरासाठी तुरुंगाची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

सत्र न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱया आणि न्यायाधीशांवर वही भिरकावणाऱया वकिलाला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठाने याप्रकरणी वकिलाला तब्बल 13 वर्षांनंतर आठवडाभरासाठी तुरुंगाची शिक्षा ठोठावली आहे. रामचंद्र कागने असे या वकिलाचे नाव आहे.

ऑक्टोबर 2005 साली परभणी येथील सत्र न्यायालयात न्यायाधीश अशोक बिलोलीकर यांच्यासमोर बलात्कार प्रकरणातील कैद्याच्या शिक्षेसंदर्भात सुनावणी सुरू होती. शिक्षा ठोठावण्यापूर्वी न्यायाधीशांनी पक्षकारांना आपली बाजू मांडण्यासाठी त्या ठिकाणी बोलावले त्यावेळी ऍड.रामचंद्र कागने यांनी संतापाच्या भरात न्यायाधीशांना मूर्ख म्हटले. शिवाय तेथील स्टेनोग्राफरकडील वही ताब्यात घेऊ न्यायाधीशांच्या दिशेने ती भिरकावली. कोर्टाचा अवमान केल्यामुळे कागने यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाकडे याप्रकरणी नुकतीच सुनावणी घेण्यात आली त्यावेळी न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती विभा कंकनवाडी यांच्या खंडपीठाने कागने याला एका आठवडय़ासाठी तुरुंगाची शिक्षा सुनावली तसेच 2 हजारांचा दंडही ठोठावला.