
एकीकडे नवरात्रीचा जल्लोष सुरु असताना यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव जंगल येथे जुगार अड्डा सुरू होता. सर्व पोलीस नवरात्रीच्या बंदोबस्तावर असतील असे समजून जुगार अड्डा राजरोस सुरू होता. एलसीबी पथकाला याची माहिती मिळताच त्यांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि 16 जुगाऱ्याना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून सुमारे 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा हाय प्रोफाइल जुगार अड्डा राजीव गिरी चालवत असल्याची माहिती मिळाली आहे.
आरोपींना मुद्देमालासह पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्याचे एलसीबीचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, सपोनि संतोष मनवर, पोउनि धनराज हाके, हवालदार विनोद राठोड, प्रशांत हेडाउ, सुभाष किनाके, शिपाई आकाश सहारे या यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.



























































