
‘वोट छोड, गद्दी छोड’ ही विरोधकांची घोषणा देशभरात सिद्ध झाली आहे. आधी आम्हाला वाटायचे की निवडणूक निकालांतच काहीतरी गडबड आहे, परंतु महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर आम्हाला मतचोरीचे ब्लॅक अॅण्ड व्हाईट पुरावे मिळाले आहेत. हे पुरावे देऊनही निवडणूक आयोग कारवाई करत नसून त्यांची हुकूमशाही चाललीय, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा हल्ला चढवला.
रायबरेलीतील हरचंदपूर विधानसभा मतदारसंघात घेतलेल्या बूथ कार्यकर्त्यांच्या सभेत राहुल गांधी बोलत होते. पुढे ते म्हणाले, निवडणुका चोरी केल्या जात आहेत, जनतेचा हक्क हिरावून घेतला जातोय. आपण संविधान वाचवण्याची ही लढाई लढत आहोत, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला. 90 टक्के लोकसंख्या ओबीसी, दलित व आदिवासींची आहे, परंतु या भाजप, आरएसएसच्या लोकांना त्यांची प्रगती व्हावी असे वाटत नाही, असा आरोप त्यांनी केला.
कर्नाटकातही दोन लाख बोगस मतदार
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीतही गडबड घोटाळा दिसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदारांची पडताळणी केली तेव्हा बंगळुरू मध्य येथे दोन लाख बोगस मतदार आढळले. याच मतदारांमुळे भाजपचा उमेदवार येथे विजयी झाल्याकडे राहुल यांनी लक्ष वेधले. बंगळुरू मध्य येथे सात विधानसभा मतदारसंघ आहेत. येथे चार महिने मेहनत घेऊन काँग्रेसने तपास केला आणि येथे बोगस मतदार असल्याचे आढळले. ही मतचोरी केवळ महाराष्ट्र आणि कर्नाटकातच नाही, तर अनेक ठिकाणी झाल्याचा आरोपही राहुल यांनी केला.
लोकसभेनंतर महाराष्ट्रात एक कोटी नवीन मतदार घुसवले
महाराष्ट्रात ‘इंडिया’ आघाडीने लोकसभा निवडणुकीत बाजी मारली. त्यानंतर चार महिन्यांनी विधानसभा निवडणुकीत आम्हाला पराभव पत्करावा लागला. याप्रकरणी जेव्हा आम्ही तपास केला तेव्हा लोकसभा निवडणुकीनंतर तब्बल एक कोटी नवीन मतदार वाढल्याचे दिसले. आम्हाला मिळालेली मते विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांइतकीच होती, परंतु वाढलेली सर्व मते भाजपला मिळाली, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. याबाबत तपास करून चार महिन्यांत एक कोटी नवीन मतदार कुठून आले याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी निवडणूक आयोगाला केली, परंतु निवडणूक आयोगाने नकार दिला. तसेच आम्ही तुम्हाला मतदारांची यादी देऊ शकतो, परंतु कुठल्याही प्रकारचे व्हिडीओ देऊ शकत नाही असे सांगितले, असेही राहुल गांधी यांनी नमूद केले.