पावसामुळे आवक घटल्याने पालेभाज्या वधारल्या, कोथिंबीर 225, मेथी 85 रुपये जुडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटल्याने दर वधारले आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी संध्याकाळी कोथिंबिरीची 225 तर मेथीची 85 रुपये जुडी दराने विक्री झाली.

आठवडय़ाच्या सुरुवातीला कोथिंबिरीची आवक 50 हजार जुडय़ा होती. तेव्हा गावठी कोथिंबिरीला 130 तर हायब्रीडला कमाल 193 रुपये दर मिळाला होता. शुक्रवारी आवक 32 हजार जुडय़ांवर घसरली. परिणामी हायब्रीडला किमान 50, कमाल 225 व सरासरी 160 रुपये दर मिळाला. गावठी कोथिंबिरीचा दर 40-150-100 रुपये असा होता.

मेथीची आवकही आठवडाभरात 5500 वरून 5100 जुडय़ांवर घसरली. तिचा दर किमान 25, कमाल 85 व सरासरी 50 रुपये होता. शेपूची आवकही निम्म्यावर म्हणजे 2500 जुडय़ा होती. दर किमान 28, कमाल 60 व सरासरी 45 असे मिळाले. आठवडाभरात मेथी व शेपूच्या दरात 20 रुपयांनी वाढ झाली आहे. कांदापातीची आवक स्थिर असली तरी कमाल दर 10 रुपयांनी वाढला आहे. काल कांदापातीला 70 रुपये जुडी भाव मिळाला.

पावसाने मोठे नुकसान
जिह्यातील बाजार समितीत प्रामुख्याने सिन्नर, दिंडोरी, निफाड, नाशिक व संगमनेर परिसरातून पालेभाज्या येतात, तर नाशिकहून गुजरात, मुंबई बाजारपेठेत पालेभाज्या पाठविल्या जातात. सध्या तेथे मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिह्यात पावसाने जोर धरल्याने आवक चारशे ते अठरा हजार जुडय़ांनी घटली आहे.

फळभाज्यांच्या दरात सुधारणा
जिह्यातून मोठय़ा प्रमाणात मुंबईसह पुण्याला फळभाज्या जातात, तर दिल्लीला सिमला मिरची पाठविली जाते. सिमला मिरचीला सध्या किमान 50, कमाल 100 व सरासरी 81 रुपये किलो दर मिळत आहे. मागील आठवडय़ाच्या तुलनेत फळभाज्यांची आवक स्थिर असली तरी कारले किलोमागे तीन रुपयांनी, कोबी पाच रुपयांनी, तर ढोबळी मिरचीचा दर सात रुपयांनी वाढला आहे.

काल टोमॅटो 25, वांगी व गिलके 50, फ्लॉवर 40, कोबी व भोपळा 30, पिकॅडोर 56, कारले 45, दोडका 62, भेंडी 33 रुपये किलो कमाल दर होते. किरकोळ बाजारात हे दर किलोमागे 10 ते 12 रुपयांनी जास्त आहेत.